पुणे : पीएमपीच्या ई-बस चालकाने रविवारी सकाळी दहाच्या सुमारास भैरोबानाला चौकात सिग्नलवर उभ्या असलेल्या दुचाकीवरील महिलेला उडवले. याची चौकशी झाल्यावर अवघ्या तासाभरातच पीएमपी अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी चालकाला बडतर्फ केले आहे.
भेकराईनगर-वारजे माळवाडी-एनडीए गेट (एमएच १२ टीव्ही ०६९३) ही गाडी हडपसरवरून पुण्याच्या दिशेने भरधाव येत होती. बसचा वेगही जास्त होता. भैरोबा नाला चौकात बस आली असता सिग्नलवर उभ्या असलेल्या एका महिलेला बसने मागून धडक दिली. या अपघातात महिला किरकोळ जखमी झाली असून दुचाकीचे नुकसान झाले आहे.
चौकात उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांनी चालकाला गाडीतून उतरवून पोलिस ठाण्यात नेले. याची माहिती पीएमपी अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांना समजताच, त्यांनी बेशिस्त चालक रोहित तानाजी गवळी (बॅच नं. २५५) याला बडतर्फ करण्याचे आदेश दिले. गवळी हा ठेकेदाराचा चालक होता. यापूर्वीही ठेकेदारांच्या अनेक चालकांकडून बेशिस्त वर्तन केल्याबाबत पीएमपी प्रशासनाकडे तक्रारी आल्या आहेत. या कारवाईमुळे आता तरी पीएमपी चालकांना काही प्रमाणात वचक बसेल, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.