धायरी: रस्त्यावरून पायी चालत जाता असणाऱ्या महिलेला रेडीमिक्स टँकरने धडक दिली. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सिंहगड रस्ता परिसरातील हिंगणी खुर्द येथे घडली. आशा नितीन पुरोहित (वय: ५६ वर्षे, रा. गणेश अपार्टमेंट, हिंगणे खुर्द, पुणे) असे त्या जखमी महिलेचे नाव असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सिंहगड रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने मुख्य रस्ता अरुंद आहे. सायंकाळी वेळ असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होती. दरम्यान आशा पुरोहित ह्या पायी रस्त्याने जात असताना रेडीमिक्स टँकरने त्यांना धडक दिली. यात त्यांच्या हात व पायाला मोठी दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेविका ज्योती गोसावी यांनी तत्परतेने रुग्णवाहिकेतून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
अवजड वाहनचालक करतात नियमांचे उल्लंघन..
डंपर, रेडीमिक्स, पाण्याचे टँकर आदी अवजड वाहनांचे चालक राजरोजपणे बेकायदेशीररित्या नियमांना बगल देत वाहने चालवत असतात. प्रशासनाने अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी ठराविक वेळ ठरवून दिली आहे. मात्र ते दिवसभर आणि रात्रभर वाहतूक करत असतात. अशा वाहनावर कारवाई करण्याची मागणी येथील स्थानिक नागरिक करत आहेत.
अवजड वाहनांना सकाळी साडेआठ ते अकरा व सायंकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत परिसरात वाहतुकीस बंदी असताना देखील नियमांचे उल्लंघन करून सर्रासपणे वाहतूक सुरू आहे. नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनावर तातडीने कारवाई करण्यात यावी. तसेच मुख्य सिंहगड रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी रस्ता म्हणून नदीपात्रातून रस्ता करण्यात यावा. - ज्योती गोसावी, माजी नगरसेविका