पुणे : आरोपीला भेटण्यासाठी आलेल्या महिलेने खडकीपोलिस ठाण्यात गोंधळ घालून तेथील महिला पोलिस कर्मचार्याला धक्काबुक्की केल्याप्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली. रिना उर्फ हिना फकिरा तायडे (३१, रा. महादेववाडी, खडकी बाजार) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी पोलिस शिपाई शिवानी शिवाजी जगताप (२९) यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकी पोलिसांनी गंभीर गुन्ह्यात सागर चांदणे या आरोपीला अटक केली. त्याला पोलिस ठाण्यातील कोठडीत (लॉकअप) ठेवण्यात आले आहे. आरोपी तायडे ही चांदणे याला भेटण्यासाठी पोलिस ठाण्यात आली.
तेव्हा कोठडीतील आरोपीस भेटण्यास मनाई असल्याचे पोलिस शिपाई जगताप यांनी सांगितले. याचा राग आल्याने रिना उर्फ हिना तायडे हीने पोलिस ठाण्यात शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच जगताप यांना धक्काबुक्की देखील केली. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तायडे हीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गुंजाळ करत आहेत.