पुणे : दारुच्या नशेत भरधाव वेगात रिक्षा चालवून चालकाने महिलेला उडविले. अपघातात महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शेवाळवाडी भाजी मार्केटच्या समोर घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी रिक्षा चालकाला अटक केली आहे. ही घटना २५ ऑगस्ट रोजी शेवाळवाडी भाजी मार्केटच्या समोर घडली. सारिका राजेंद्र चव्हाण (वय ३८, रा. लोणी काळभोर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अमोल सज्जन कानगुडे (वय ३६, रा. वाडगे वस्ती, लोणी काळभोर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार आनंद रविंद्र दोडके (वय ४०, रा. हिंगणे मळा, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, आरोपी रिक्षा चालक आनंद दोडके दारुच्या नशेत भरधाव वेगात रिक्षा चालवत हडपसरवरुन लोणीकडे जात असताना त्याने शेवाळवाडी येथे भाजी विक्री करणार्या सारिका चव्हाण यांना जोराची धडक दिली. यात सारिका या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या मेंदूला मार लागला होता. त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केल्याचे फिर्यादेत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गांधले करत आहेत.