चंदननगर : बुधवारी सकाळी सहाच्या दरम्यान नगर रस्त्यावरून खराडीला जाणाऱ्या भरधाव बसखाली आल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
पाचवा मैल येथील टाटा गार्डरूम चौक येथे आज (ता. ११) पहाटे सहा वाजताच्या दरम्यान भरधाव वेगात पीएमपीएमएल बस क्रमांक एमएच १२ - आरएन ६०५९ खराडी गाव या बसने एमएच १२ - बीएच ६६९४ या दुचाकीला जोरदार टक्कर मारली. यात दुचाकीवरील अशोक देवबहादूर धर्ती (वय ३२, रा. आनंद पार्क, वडगावशेरी. मूळ निवासी नेपाळ) हा तरुण गंभीर जखमी झाला. त्यास ससून रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. याबाबत गोपाल देवबहादूर (वय ३३, रा. आनंद पार्क, वडगावशेरी) यांनी बस चालक रवींद्र गेनबा गायकवाड (वय ४०, रा. स.नं. समर्थ हाईट्स आंबेगाव पठार, धनकवडी) फिर्याद दिली.
चंदननगर टाटा गार्डन चौक येथे भरधाव वेगात पुण्याहून येणारी बस वडगावशेरीच्या दिशेला वळण घेत असताना खराडीकडून येणाऱ्या दुचाकीस्वाराला समोरून जोरदार धडकली. यात दुचाकी पुढच्या चाकाखाली आली आणि दुचाकीवरील तरुण दुचाकीसह बसखाली अडकला. या तरुणाला ससून रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचारापूर्वी या युवकाचा मृत्यू झाला. बसचालकाविरोधात मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास चंदननगर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे करीत आहेत.