शिवणे (पुणे): नांदेड-शिवणेला जोडणाऱ्या पुलावरून मुठा नदीतील पाणी जोरात वाहत आहे. खडकवासला धरणातून पाण्याच्या विसर्ग वाढवण्यात येत असल्यामुळे नदीची पाणीपातळी वाढत आहे. आज पहाटे साडेचारच्या सुमारास शिवणेवरून नांदेडमध्ये जाणाऱ्या दोन युवकांपैकी एक युवक निखिल कौशिक हा वाहून गेल्याची घटना घडली आहे. तर दुसरा युवक आशिष देविदास राठोड खांबाला पकडून जीव वाचवून उभा होता, त्याला बाहेर काढण्यात यश आले आहे. याबद्दलची माहिती उत्तम नगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी दिली.
सकाळी ६ च्या सुमारास शिवणे गावातील तरुण विद्याधर दळवी, महेश कांबळे, राज वाल्मिकी यांनी पोलिसांच्या मदतीने खांबाला धरून असलेल्या तरुणाला दोराच्या सह्याने जीव धोक्यात टाकून मोठ्या हिमतीने वाचवले आणि त्याला बाहेर काढले.
तरुणाची चौकशी करण्यासाठी त्याला उत्तमनगर पोलीस स्टेशनला नेण्यात आल्याची माहिती तरूणाने दिली. धरणातून पाणी सोडल्यापासून पुलाच्या दोन्ही बाजूने वाहनांना जाण्यास बंदी करण्यात आली आहे, हे दोघे तरुण बॅरिगेट ओलांडून गेले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.