भोर (पुणे) : भोर-महाड रस्त्यावरील वरंधा घाटात वाघजाई मंदिरासमोर सेल्फी काढण्याच्या नादात ५०० फूट खोल दरीत तरुण कोसळल्याची घटना मंगळवारी (दि. ३) रात्री ७ वाजेच्या सुमारास घडली. या तरुणास शोधण्यासाठी महाड व भोर येथील रेस्क्यू टीम तसेच प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून, तरुणाचा शोध सुरू आहे.
वरंध घाटात भोर तालुक्याच्या हद्दीत एक तरुण सेल्फी काढत आसताना अचानकपणे तोल जाऊन तो ५०० फूट दरीत कोसळला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तरुणाला शोधण्यासाठी महाड व भोर तालुक्यातील सह्याद्री रेस्क्यू टीम तसेच भोर प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहेत. तरुणाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. तो तरुण कोण आहे किंवा काय अवस्थेत आहे हे अजूनही प्रशासनाला तसेच रेस्क्यू टीमच्या तरुणांना समजलेले नाही.
वरंधा घाटातील वाघजाई मंदिराशेजारी एक लाल कलरची चारचाकी गाडी (क्र. एमएच ०३ बीई ७४१५) उभी आहे. या गाडीतील हा तरुण असल्याचे प्रवासी तसेच वाहन चालकाकडून सांगण्यात येत आहे. तरुणाचा शोध घेण्यासाठी भोर तसेच महाड येथील रेस्क्यू टीम व नायब तहसीलदार मनोहर पाटील, सर्कल पांडुरंग लहारे, भोर पोलिस विकास लगस, उद्धव गायकवाड घटनास्थळी दाखल झाले आहेत, असे भोरचे तहसीलदार सचिन पाटील यांनी सांगितले.