वेल्हे : रस्त्याच्या दुरवस्थेमुळे १५ किमी अंतर पार करून रुग्णालयात जाण्यास उशीर झाल्याने, एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याचा प्रकार राजगड तालुक्यात घडला आहे. केवळ खराब रस्त्यामुळे आपल्या मुलाला जीव गमवावा लागल्याने, त्या मुलाचे पालक संताप व्यक्त करत आहेत. संदेश संभाजी इंगुळकर (वय १८) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
संभाजी इंगुळकर हे मूळचे वेल्हे तालुक्यातील राहणारे. मात्र, ते कामानिमित्त पुण्यातील कात्रज भागामध्ये स्थायिक झाले. इंगुळकर यांना दोन मुले. त्यातला छोटा मुलगा संदेश इंगुळकर याला लहानपणापासून अस्थमाचा त्रास होता. वयाच्या पाचव्या वर्षी त्याच्यावर शस्त्रक्रिया केल्यामुळे तो त्रास थांबला होता. सर्वसामान्य मुलांप्रमाणे तोही जगत होता. मात्र, १० नोव्हेंबर रोजी शेतात काम करत असताना त्याला अचानक श्वसनाचा त्रास सुरू होऊ लागला. मात्र, त्याच्यावर उपचारासाठी गावात सुविधा उपलब्ध नव्हत्या, तर सोंडे सरपले येथील उपकेंद्र बंद असल्यामुळे घरातील व्यक्ती त्याला घेऊन उपचारासाठी गावापासून नसरापूरकडे जाण्यासाठी निघाले. मात्र, अंबवणेमार्गे अत्यंत खराब रस्ता असल्याने ते कोदवडीमार्गे नसरापूर दिशेने चालले असता, अत्यंत खराब रस्त्याने गाडी सावकाश चालवावी लागत होती. त्यातच गुंजवणी नदीवरील कोदवडी येथील अरुंद पुलावर भात काढण्यासाठी आलेला हार्वेस्टर त्या पुलावर अडकला. त्या ठिकाणी वीस ते पंचवीस मिनिटे वेळ गेला. तिथून पुढे करंजावणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र असून नसल्यासारखे आहे, कारण त्या ठिकाणी योग्य ते उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी असल्याने, त्या ठिकाणी न थांबता व संदेशचा त्रास वाढू लागल्याने त्यांच्या कुटुंबाने नसरापूरकडे जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, नसरापूरकडे जाणाऱ्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने व नसरापूर गावात जाण्यासाठी बनेश्वर फाट्यापासून मोठी गर्दी असल्याने ट्रॅफिक जाम झाल्याने दवाखान्यापर्यंत जाण्यासाठी गावापासून दीड तास लागला. मात्र, जोपर्यंत त्या रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच संदेशचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
प्रशासनाच्या हलगर्जीपणा
संदेशचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत संदेशचे वडील संभाजी इंगुळकर यांनी प्रशासनाच्या गलथान कारभारमुळे माझ्या मुलाचा मृत्यू झाला, असा संताप व्यक्त केला आहे. तालुक्यात प्राथमिक विकासाअभावी नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. आज जर जाण्यासाठी रस्ते नीट असते, तर माझ्या मुलावर वेळेत उपाचार झाले असते आणि त्याचा जीव वाचला असता. फक्त १५ किमीच्या प्रवासासाठी दीड तासाचा कालावधी लागला. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या हलगर्जीपणामुळेच माझा मुलगा आज माझ्यात नाही. आता तरी या रस्त्याचे वेळेत कामे मार्गी लावा, म्हणजे आणखी कुणाचा बळी जाणार नाही, अशी प्रतिक्रिया इंगुळकर व्यक्त करत आहेत.