पुणे : हडपसर परिसरातील हांडेवाडी येथील रिदम सोसायटी समोरील मोकळ्या जागेत अज्ञात व्यक्तीने एका तरुणाचा डोक्यात व शरीरावर मारहाण करुन खून केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन हडपसरपोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना रविवारी (ता. १२) रात्री पावणे आठच्या सुमारास घडली होती.
राजेंद्र रामभाऊ शेजुळ (३५, रा. कडनगर, चौक, उंड्री मूळ रा. बुलढाणा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी राजेश सिताराम सोनकर (२५, रा. माऊलीनगर, कात्रज, मूळ रा. मथुरा विलासपुर, जि. बलमरापुर, उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे. याबाबत राजेंद्र यांची पत्नी भाग्यश्री राजेंद्र शेजुळ (२९) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी राजेंद्र शेजुळ याच्या नातेवाईकांकडे माहिती घेतली असता, त्याला दारूचे व्यसन असल्याची माहिती मिळाली. तसेच गुन्ह्याच्या घटनास्थळी परिसरात मोकळ्या जागी दारु पिण्यासाठी दारुडे लोक बसत असल्याची माहिती मिळाली. यावरून आरोपीचा शोध घेत असताना, घटनास्थळ परीसरात हांडेवाडी-सय्यदनगर रोड या ठिकाणी पीओपीचे काम करणाऱ्या राजेश सोनकर याचे मयत राजेंद्र शेजुळ याच्यासोबत दारु पिण्यावरुन वाद झाल्याची माहिती मिळाली.
पोलिसांच्या पथकाने आरोपीचा कात्रज परीसरात शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता शनिवारी (ता. ११) सकाळी अकराच्या सुमारास राजेंद्र शेजुळ याच्यासोबत दारु पित असताना त्याच्याकडे १०० रुपये मागितले. त्यावेळी राजेंद्र याने शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. याचा राग मनात धरून राजेंद्र याला लाकडी बांबूने डोक्यावर व अंगावर मारहाण केल्याचे सोनकर याने सांगितले.
ही कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त प्रवीण पवार, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त आर राजा, सहायक पोलिस आयुक्त अश्विनी राख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे, पोलिस निरीक्षक गुन्हे मंगल मोढवे, पोलिस निरीक्षक गुन्हे उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलिस उपनिरीक्षक महेश कवळे यांच्यासह पथकाने केली.