पुणे: बोपदेव घाटात मित्रांबरोबर फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणाला धमकावून त्याच्याकडील दुचाकी चोरणा-या चोरट्यांविरुद्ध कोंढवा पाेलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत एका तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तो आणि त्याचे मित्र बोपदेव घाटात फिरायला गेले होते. घाटमाथ्यावर मध्यरात्री दोनच्या सुमारासते थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरून तीन चोरटे आले आणि त्यांनी तरुणाला धमकाविण्यास सुरुवात केली. चोरट्यांनी तरुणाला चाकूचा धाक दाखविला. त्याच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली. मात्र, तरुणाकडे पैसे नसल्याने त्याने चोरट्यांना पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर तक्रारदार तरुण आणि त्याच्या मित्राला सासवड रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाजवळ चोरट्यांनी नेले. तरुणाच्या मित्राला धमकावून दुचाकीत ५०० रुपयांचे पेट्रोल भरण्यास सांगितले. त्यानंतर तरुणाची दुचाकी घेऊन चोरटे सासवडकडे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक बिराजदार तपास करत आहेत.