पुणे : मोबाईल हिसकावताना विरोध करणाऱ्या तरुणाला २०० ते ३०० मीटर फरपटत नेणाऱ्या चोरट्यांना हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून ७० हजारांचा ऐवज जप्त केला आहे. ही घटना भगीरथीनगर परिसरातील डी. पी. रस्त्यावर घडली होती. मंथन त्रिलोक पवार (वय १९, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा), रोहित किरण वाणी (२१, रा. धायरकर वस्ती, मुंढवा) आणि कृष्णा संजय वाणी (२०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
तक्रारदार तरुण डीपी रस्त्यावरून पायी चालत असताना दुचाकीस्वार तिघा चोरट्यांनी त्याचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तरुणाने त्यांचा विरोध केला. यावेळी चोरट्यांनी २०० ते ३०० मीटर अंतरावर तक्रारदाराला फरपटत नेले होते. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी तपासाला गती दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन कुदळे, उपनिरीक्षक महेश कवळे, कुंडलिक केसकर, चंद्रकांत रेजितवाड यांनी सीसीटीव्ही तपासले. यात १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपींची ओळख पटली. त्यानुसार आरोपींना ताब्यात घेत अटक केली. ही कामगिरी पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नीलेश जगदाळे, अमर काळंगे, प्रशांत दुधाळ आणि निखिल पवार यांनी केली.