मोरगाव : बारामती तालुक्यातील मुर्टी येथील जाधव वस्ती शेजारुन वाहणाऱ्या ओढ्यातुन रात्री वाहून गेलेल्या तरुणाच्या गाडीचा शोध लागला. या गाडीच्या नंबर वरून वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी अधिक शोध घेतला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार वाहून गेलेला व्यक्ती बचावला असून रांजणगाव येथे सुखरूप पोहोचला असल्याचे त्यांनी सांगितले.
याबद्दल सविस्तर वृत्त असे की, काल मुर्टी येथील ओढ्यात एक दुचाकीस्वार वाहून गेला असल्याच्या प्रत्यक्षदर्शनी माहीतीवरुन पोलीस प्रशासन व स्थानिक युवकांच्या मदतीने संबंधीत व्यक्तीचे शोधकार्य आज दुपारी एक वाजेपर्यंत सुरू होते. दरम्यान घटनास्थळी बारामती प्रांताधिकारी दादासो कांबळे, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी अनिल बागल, करंजेपूल पोलीस स्टेशनचे पोलिस इन्स्पेक्टर योगेश शेलार, पोलिस हवालदार अमोल भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी भेट दिली. शोधकार्य सुरु असताना दुचाकी ओढ्यातील पाण्यामध्ये राजाराम बालगुडे व राज तांबे यांना सापडली.
दुचाकीच्या नंबरवरुन संबंधित व्यक्ती कुठला याचा शोध वडगाव निंबाळकर पोलिसांनी घेतला. या व्यक्तीचे नाव सागर अरविंद पाटील असून हा व्यक्ती सांगली शहरातील राहणारा असल्याची माहिती पुढे आली. त्याच्या घरी विचारपूस केली असता ओढा पत्रातून पोहत तो ओढ्यातील पुरातुन सुखरुप बाहेर आला असल्याची माहीती सांगली येथील निवासी त्याच्या नातेवाईकांनी दिली. तो त्याच्या पत्नीकडे रांजणगाव येथे सुखरुप पोहोचला असल्याची माहिती वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सोमनाथ लांडे यांनी सांगितले.