लोणी काळभोर (पुणे) : पत्नीशी का बोलतो, असे म्हणून पतीने तरुणाला जीवे मारण्याच्या उद्देशाने लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. डोक्यात केलेल्या या मारहाणीमुळे तरुण बेशुद्ध पडला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. विशाल कामठे (वय २३) असे या मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी राहुल महादेव मगर (व २७, रा. वनपुरी, ता. पुरंदर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संतोष माणिक जाधव (रा. वडकीनाला) याच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार वडकीनाला येथील ज्योती लॉजजवळ घडला. याबाबत लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल कामठे हा बारावी शिकला असून सध्या काही काम धंदा करत नाही. तो एका महिलेला भेटण्यासाठी ज्योती लॉजसमोर गेला होता. यावेळी संतोष जाधव तेथे आला व त्याने तिच्याशी बोलतो, भेटतो, या कारणावरुन चिडून विशालला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. लाकडी दांडक्याने शरीरावर तसेच डोक्यात मारहाण केली. त्यात विशाल गंभीर जखमी झाला व बेशुद्ध पडला. त्याला रुग्णालयात दाखल केले असून डॉक्टरांनी त्याच्या डोक्यावर शस्त्रक्रिया केली आहे.
विशाल बेशुद्ध असल्याने पोलिसांनी त्याच्या मामाची फिर्याद घेतली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर करीत आहेत. पोलिसांनी संतोष माणिक जाधव (रा. वडकीनाला) याच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.