पुणे : रात्री अकरा वाजता ड्यूटी संपवून घरी जात असताना, गुंडांशी दोन हात करून एका जखमी तरुणाचे प्राण वाचविण्याचे जिगरबाज कार्य महिला पोलिस हवालदार सीमा वळवी यांनी केले. या कर्तव्य तत्परतेची दखल घेत पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी वळवी यांचा जाहीर सत्कार करून त्यांना शाबासकी दिली. या प्रसंगी सह पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, संभाजी कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे, गजानन पवार यांची उपस्थिती होती.
पोलिस हवालदार वळवी या २४ डिसेंबर रोजी रात्री ड्यूटी संपवून घरी निघाल्या होत्या. तेव्हा आनंद पार्क रस्त्यावर काही जण एकमेकांसोबत वाद घालत होते. वळवी त्यांना समजावून सांगत होत्या. त्यावेळी एका तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले. प्रसंगावधान राखत वळवी यांनी कोयत्याने वार करणाऱ्या आरोपीचा प्रतिकार करून जखमी तरुणाची सुटका केली. एकाला पकडून ठेवले.
याबाबत वळवी यांनी पोलिस नियंत्रण कक्ष आणि चंदननगर पोलिस ठाण्याला माहिती दिली. त्यानुसार पाेलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होत अवघ्या २० मिनिटांत पाच आरोपींना ताब्यात घेतले. वळवी यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे जखमी तरुणाचे प्राण तर वाचले अन् आरोपीदेखील गजाआड झाले.