लोकमत न्यूज नेटवर्क नीरा : वीर धरणामधून मोठ्या प्रमाणात सोडलेले विसर्गामुळे सध्या नीरा नदी दुथडी भरून वाहत आहे. सोमवारी (दि. २६) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास नीरा येथील युवकाने दुथडी भरून वाहत असलेल्या नीरा नदीमध्ये ब्रिटिशकालीन पुलावरून उडी मारली. सचिन बापूराव गोरे (वय ३०) रा. नीरा वार्ड नं. ३ असे या युवकाचे नाव आहे. जेजुरी पोलीसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील यंत्रणाना माहिती दिली आहे.
सोमवारी दिवसभर नीरा नदीच्या पात्रात मोठ्याप्रमाणावर पाणी वेगात वाहत आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास नीरा नदीच्या पात्रात वीर धरणातून ४३ हजार ०८३ क्युसेक्स वेगाने पाणी वाहत होतं. यावेळी जुन्या ब्रिटिशकालीन पुलाच्या काठावरुन पाणी वाहत होते. सचिन गोरे या युवकाने दुथडी भरून वाहत असलेल्या नीरा नदीमध्ये ब्रिटिशकालीन पुलावरून उडी मारली. हा तरुण नशेमध्ये असल्याचे प्रथमदर्शी पाहणाऱ्यांनी सांगितले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सचिन गोरे हा नीरा नदीवरील जुन्या ब्रिटीश कालीन पुलावर आल्यानंतर कपडे काढून तो उडी मारण्याचा प्रयत्न करत असताना अनेक तरुणांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न देखील केला. परंतु सर्वांकडे दुर्लक्ष करून त्याने ब्रिटिशकालीन पुलावरून उडी मारली. नशेमध्ये असल्याकारणाने त्यांनी कोणाचेही ऐकले नाही. ब्रिटिशकालीन पुलावरती पाण्याचा प्रवाहाचा वेगात असल्याकारणाने तो तरुण वाहत खाली गेला. नीरा येथील युवकांनी बरीच शोधाशोध केल्यानंतरही तो अद्याप सापडला नाही. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार जेजुरी पोलीसांनी घटनेची नोंद घेतली आहे. नदीपात्राच्या शेजारील पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना व पुढील यंत्रणाना युवक पाण्यात वाहून गेल्याची माहिती दिल्याची माहिती जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांनी दिली.