भिगवण :पुणे-बारामती येथील कोयता गँग भिगवण येथे सक्रिय होतीय काय असा सवाल भिगवण येथील हायस्कूल समोरील मारामारीचा शो पाहून नक्कीच येईल. भिगवण पोलिसांनी आपला तिसरा डोळा उघडला नाही तर गुंडगिरी पुन्हा डोके वर काढील यात शंका मात्र नक्कीच घेता येणार नाही .आणि हे भिगवण गावच्या सामाजिक आरोग्यासाठी घातक ठरू शकेल.
भिगवण नेहमीच रोडरोमिओंसाठी प्रसिद्ध राहिले आहे.याच त्रासाला कंटाळून काही पालकांनी आपल्या मुलींची एक तर शाळा बंद केली अथवा दुसरीकडे जाणे पसंद केल्याचे दिसून येते. बऱ्याच वेळा काही पोलिस अधिकारी आपला हिसका दाखवून त्यांना ताळ्यावर आणण्याचे काम ही केले आहे. मात्र सोमवारी घडलेल्या कला महाविद्यालय परिसरात एका तरुणाला ८ ते १० तरुणांनी अडवून करीत असलेली मारहाण पाहून पोलिसांनी आपला तिसरा डोळा उघडण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.
कला महाविद्यालयात आज १० वाजता एका तरुणाला ८ तरुण हाताने. लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने धुलाई करत असताना इतरांनी मात्र यात मध्यस्थी केल्याचे दिसून आले नाही.त्यामुळे मार खाणारा तरुण शाळा परिसरातून मिळेल त्या रस्त्याने धावताना दिसून आला. याची माहिती पोलिसांना मिळताच भिगवण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली मात्र तो पर्यंत चित्रपट संपला होता आणि खलनायक गायब झाल्याचे दिसून आले.
याबाबत भिगवण पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांच्याशी संपर्क साधला असता याविषयी कोणीही तक्रार दिली नसून भिगवण पोलिसांनी स्वता फिर्यादी होत सार्वजनिक ठिकाणी भांडणे आणि मारामारी केल्याबद्दल ६ आरोपी विरोधात गुन्ह्याची नोंद केली असल्याची माहिती दिली.तसेच याप्रकरणी आरोपी विरोधात कठोरात कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.