लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात ७६२ पेक्षा अधिक महिलांनी कोरोनामुळे पती गमवले असून, कुटुंबाची सर्व जबाबदारी महिलांवर आली आहे. सध्या या महिलांना आधार देण्यासाठी शासनाची कोणतीही योजना नाही. यामुळेच जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी पुढाकार घेत अशा महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. आतापर्यंत जिल्ह्यात २६५ महिलांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात आला आहे. शिल्लक व पात्र महिलांना हे लाभ मिळवून देण्यासाठी तालुकास्तरावर प्रस्ताव मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. संजय गांधी निराधार योजनेतून महिलांना दर महा हजार रुपयांची मदत होणार आहे.
स्वतंत्र योजना नाही, पण संजय गांधी निराधार योजनेतून लाभ
कोरोनामुळे दोन्ही पालक गमवलेल्या बालकांना आधार देण्यासाठी शासनाने स्वतंत्र योजना सुरू केली आहे. परंतु कोरोनामुळे पतीचे निधन झालेल्या महिलांवर संपूर्ण कुटुंबांची जबाबदारी आली आहे. अशा महिलांना देखील आता आधाराची गरज निर्माण झाली आहे, पण सध्या स्वतंत्र योजना नाही. यासाठी शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेतून लाभ देण्यात येत आहे.
- डाॅ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी
------
तालुकानिहाय मदत दिलेल्या महिलांची संख्या
हवेली 84, बारामती 36, दौंड 4, इंदापूर 6, जुन्नर 18, मावळ 10, मुळशी 23, आंबेगाव 20, पुरंदर 23, खेड 13, शिरूर 22, वेल्हा 6