लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : तीन साक्षीदार फितूर झाले. पण घटनेच्या ठिकाणी आरोपीचे आधार कार्ड, तसेच शर्टाचे बटन सापडले. पोलिसांनी गुन्ह्यात जप्त केलेल्या शर्टाचेच ते बटण असल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. तसेच, कपड्यावर असलेले रक्ताचे डाग आणि त्याने दाखवलेली घटनास्थळाची जागा हे परिस्थितीजन्य पुरावे, सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेप आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. सत्र न्यायाधीश ए. एन. सिरसीकर यांनी हा आदेश दिला.
दुर्गेशनाथ गोपीनाथ गोस्वामी (वय २९, रा. लोहगाव, मूळ. राजस्थान) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. नरसिंगराम बुटाराम गर्ग असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत येरवडा पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग साबळे यांनी फिर्याद दिली आहे. सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील संजय पवार यांनी सात साक्षीदार तपासले. ही घटना २८ ते २९ ऑक्टोबर २०१८ रोजी घडली. गर्ग आणि गोस्वामी दोघेही मूळचे राजस्थानचे. दोघेही चांगले मित्र. गोस्वामीचे फर्निचरचे काम गर्गने केले होते. त्याचे दोन हजार रुपये तो वारंवार मागत होता. २८ ऑक्टोबरला गर्गने पैशाची मागणी केली. त्यावेळी गोस्वामीने त्याला एक हजार रुपये दिले. दारू प्यायल्यानंतर २९ ऑक्टोबरला पहाटे ते दुचाकीवरून लोहगावकडे चालले होते. त्यावेळी संगमवाडीकरून सादलबाबा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ते लघुशंकेसाठी थांबले. त्यावेळी दोघात पुन्हा भांडण सुरू झाले. त्यावेळी गोस्वामीने गर्ग यास शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यानंतर लाथ मारल्यानंतर बाजूला असलेल्या ओढ्यात गर्ग पडला. वरून सिमेंटचा ब्लॉक मारून गोस्वामीने मित्राचाच खून केला. खिशातील एक हजार रुपये घेऊन तो निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
-----------------------------------------------------