पुणे : कोरानामुळे गेली दोन वर्षे सर्व सार्वजनिक सण, उत्सवांना बंदी होती. नुकतेच शिंदे सरकारने उत्सवाला परवानगी दिल्याने सध्या पुणे शहरात कसबा पेठ तसेच इतर गाेविंदा पथकांनी दहीहंडी उत्सवाची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासाठी थर रचण्याचा सरावही करण्यात येत असून, तरुण मुले आपला व्यवसाय करून रात्रीच्या वेळी सरावास येत आहेत.
दहीहंडीचा उत्साह पुण्याच्या सांस्कृतिक राजधानीत काही अनाेखाच असताे. तरुणांची अनेक मंडळे एकापाठोपाठ एक असा दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करण्यासाठी महिनाभर आधीच तयारी करतात. पुण्यात सध्या कसबा पेठ पवळे चौक या भागात सरावाची तयारी सुरू केली आहे. ‘गोविंदा आला रे’च्या घोषणांनी आजूबाजूचा परिसर दुमदुमून जात आहे. येथील शिवजेत गोविंदा पथकानेही जाेरदार तयारी सुरू केली आहे.
दहीहंडी उत्सवासाठी शहरात मोठ्या प्रमाणात शहरातून तसेच बाहेर गावावरून नागरिक येतात. यामध्ये मंडईमधील दहीहंडी, बाबू गेेणू चौक, धनकवडी येथील जानूबाई दहीहंडी उत्सव, गुलाबनगर येथील कानिफनाथ तरुण मंडळ, शिवांजली मित्र मंडळ, कोथरूडमधील खास महिलांची दहीहंडी उत्सव हे उल्लेखनीय असतात.
किमान १२ वाजेपर्यंत परवानगी दिली पाहिजे
कोरोनाच्या दोन वर्षांनंतर निर्बंध शिथिल केल्यामुळे गणेश उत्सव, दहीहंडी उत्सव यावर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. गाेविंद पथक व कार्यकर्ते यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सरकारने परवानगी दिली असली तरी अद्याप नियमावली आलेली नाही. सरकारने यावर्षी किमान वेळ वाढवून दिली पाहिजे. अपुरा वेळ असल्याने गोविंदा पथकांना दहीहंडी फोडताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असेत. यामुळे किमान १२ वाजेपर्यंत परवानगी दिली पाहिजे. -प्रकाश राऊत व सागर भोकसे, शिवतेज गोविंदा पथक, कसबा पेठ.
दहीहंडी उत्सवात महिलांचा सन्मान
महिलांची दहीहंडी खासकरून या भागातील महिलांना आकर्षक करीत असते. मोठे थर लावून महिलाच ही दहीहंडी फोडतात. यामध्ये महिलांसाठी विशेष कार्यक्रम राबवले जातात. दहीहंडी उत्सवात महिलांचा सन्मान केला जातो. एक महिन्यापासून या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. - किशोर शिंदे, ओम चॅरिटेबल ट्रस्ट, कोथरूड.