पुणे : ‘आली आली गौर आली, सोन्याच्या पावलांनी आली, सुखसमृद्धधी घेऊन आली’...म्हणत गुरुवारी घरोघरी गौरींचे पारंपारिक पद्धतीने आगमन झाले. अनुराधा नक्षत्राचा मुहूर्त गाठायचा असल्याने गृहिणींसह नोकरदार महिलांची सकाळपासूनच लगबग सुरु होती. रांगोळीचा सडा अन लक्ष्मीची पावले काढत महिलांनी गौरींचे स्वागत केले.
श्रीगणेशाच्या प्रतिष्ठापनेनंतर महिलांना गौरी आगमनाचे वेध लागतात. यंदा गणेशाच्या आगमनानंतर तिसऱ्याच दिवशी गौरी घरोघरी विराजमान झाल्या. सोनपावलांनी वाजतगाजत गौरींचे आगमन झाले. भाद्रपद शुद्ध सप्तमीला गौरी आवाहन केले जाते. पारंपरिक पेहरावामध्ये नटून थटून सुवासिनींनी गौरींचे आवाहन करतात. कुलाचारानुसार काही घरांमध्ये गौरींचे शाडूचे मुखवटे तर, काही घरांमध्ये पितळी मुखवटे बसवून गौरी बसविण्यात आल्या.
काही घरांमध्ये गौरी आवाहनानंतर ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरींना अलंकार परिधान करून त्यांची सजावट करण्यात आली. गौरींच्या आगमनादिवशी त्यांना भाकरी भाजीचा नैवैद्य दाखविण्याची प्रथा आहे. त्यानुसार त्यांना सुवासिनींनी भाकरी-भाजीचा नैवैद्य दाखविला. गौरीच्या आगमनाच्या दुस-या दिवशी शुक्रवारी (दि.22) घरोघरी गौरी पूजन पार पडणार असून, या माहेरवाशिणींना गोडाधोडाचा नैवैद्य दाखविला जाणार आहे. पाचव्या दिवशी अनेक घरांमध्ये गौरींबरोबर गणपतीचेही विसर्जन करण्याची परंपरा आहे. त्यानुसार गौरी-गणपतींचे विसर्जन केले जाईल.