आंबेठाण : आदिवासी ठाकर समाजातल्या नव्या पिढीने निवडणुकीपुरता आपला वापर न होऊ देता आपले प्रश्न सोडवण्यासाठी धाडसाने पुढे आले पाहिजे, यासाठी ‘आमची ठाकरवाडी - आमचा विकास’ हा उपक्रम सुरू केला आहे. आजवर केलेल्या कामाचा आढावा आणि गरजेच्या कामाचे नियोजन या समाजाला विश्वासात घेऊन केले जाणार आहे, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी वराळे (ता. खेड) येथे केले.
पिंपरी पाईट जिल्हा परिषद गटातील ४५ हून अधिक ठाकर वाड्यांमधील सुशिक्षित तरुणांसाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सविता गावडे, सुरेखा ठाकर, पाईटच्या सरपंच मंगल भांगे, पंचायत समितीचे उपसभापती चांगदेव शिवेकर, युवा नेते रोहित डावरे पाटील, बाजीराव पारधी, सुरेश काळे यांचेसह ठाकर समाजातील आजी-माजी पदाधिकारी व सुशिक्षित तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडणुकीशिवाय बहुतांशी नेते आणि कार्यकर्ते ठाकरवाड्यांकडे डोकावूनदेखील पाहत नाही. निवडणुकीच्या आदल्या दिवशीच या आदिवासी वाड्यांची आठवण होते, हे वर्षानुवर्षे असलेले चित्र आपल्याला बदलायचे आहे. हा समाज जागृत करण्यासाठी आपण हा उपक्रम सुरू केल्याची भावना यावेळी बुट्टे पाटील यांनी मांडली.
यावेळी ठाकर वाड्यांमधील केलेली विकास कामे आणि उर्वरित कामे, व्यक्तिगत लाभाच्या विविध योजना, जातीचा दाखला, रेशन कार्ड ,आधार कार्ड, संजय गांधी निराधार योजनेच्या योजना आदी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. प्रास्ताविक शिवाजी डावरे पाटील यांनी केले, तर आभार सुनीता बुट्टेपाटील यांनी मानले.
वराळे येथे आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यशाळेत उपस्थित तरुण.