मुंबई : बॉलीवूड अभिनेता आमिर खान याचा दूरचित्रवाणीवरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘सत्यमेव जयते’विरुद्ध उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. राजमुद्रेचा वापर न करताच ‘सत्यमेव जयते’ असे लिहिण्यात येत असल्याचे याचिकेत म्हटले आहे. याबाबत उच्च न्यायालयाने संबंधित दूरचित्रवाणी वाहिनी आणि आमीर खान याला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. ‘सत्यमेव जयते’ हे राष्ट्रीय चिन्हाचा भाग आहे. मात्र या कार्यक्रमात राजमुद्रेचा वापर न करता केवळ ‘सत्यमेव जयते’चा वापर करण्यात येतो. त्यामुळे ‘स्टेट एम्ब्लेम आॅफ इंडिया’ (प्रतिबंध आणि अयोग्य वापर) कायदा आणि ‘स्टेट एम्ब्लेम आॅफ इंडिया’ (वापरासंबंधी नियम) नियमांचे उल्लंघन केले जात आहे, असे याचिकाकर्ते मनोरंजन रॉय यांनी याचिकेत नमूद केले आहे.या याचिकेवर केंद्रीय गृहमंत्रालयाने केवळ ‘सत्यमेव जयते’चा वापर करून कायद्याचे किंवा नियमाचे उल्लंघन करण्यात आले नसल्याची भूमिका उच्च न्यायालयापुढे घेतली. ‘बोधचिन्हातील ‘सत्यमेव जयते’च वापरल्याने कायद्याचा किंवा नियमांचा भंग होत नाही. राष्ट्रीय बोधचिन्हाचा गैरवापर होऊ नये, यासाठी कायद्यात व नियमांत तरतूद करण्यात आली आहे, असे गृहमंत्रालयाने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. भविष्यात कोणी बोधचिन्ह म्हणून केवळ राजमुद्राच वापरली आणि ‘सत्यमेव जयते’ वापरले नाही तरीही तुम्ही अशीच भूमिका घ्याल का?, अशी विचारणा न्या. अभय ओक व न्या. गिरीश कुलकर्णी यांनी केंद्राला केली. अॅडिशनल सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांना २० मार्च रोजीच्या सुनावणीवेळी उपस्थित राहण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)
‘सत्यमेव जयते’बाबत आमिर खानला उत्तर देण्याचे निर्देश
By admin | Published: March 12, 2016 3:54 AM