पिंपरी :पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसेसचे लाइव्ह लोकेशन, बस किती वेळेत थांब्यावर येणार, अशी सर्व माहिती प्रवाशांना ‘आपली पीएमपीएमएल’ या ॲपवर दिसत आहे. मात्र, मंगळवारी (दि. १९) या ॲपची सेवा विस्कळीत झाली होती. प्रवाशांना बसची कोणतीच माहिती मिळत नव्हती.पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासाठी महत्त्वाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून ‘पीएमपी’कडे पाहिले जाते. ‘पीएमपी’कडून १६५० ते १७०० बसमार्फत ३७१ मार्गांवर सेवा दिली जाते. दिवसाला साधारण दहा ते बारा लाख प्रवासी प्रवास करतात. ‘पीएमपी’च्या बसचे ‘लाइव्ह लोकेशन’ प्रवाशांना दिसावे, ऑनलाइन तिकीट काढता यावे, ऑनलाइन तक्रार करता यावी, म्हणून ‘पीएमपीएमएल’ने ‘आपली पीएमपीएमएल’ हे ॲप विकसित केले आहे. ते १५ ऑगस्टपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाले आहे.मंगळवारी सायंकाळी या ॲपवर प्रवाशांना बसचे लाइव्ह लोकेशन, बसचा मार्ग, बस क्रमांक आदी माहिती दिसत नव्हती. त्यामुळे नियमित ॲप वापरणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली. अगोदरच निवडणूक कामासाठी ९६८ बस दिल्या होत्या. त्यामुळे मार्गावरील बस कमी झाल्या होत्या. त्यात बसची माहिती मिळत नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
आपली पीएमपीएमएल ॲपची सेवा विस्कळीत; प्रवाशांची गैरसोय
By अविनाश रावसाहेब ढगे | Published: November 20, 2024 3:46 PM