पुणे: सरकारी नोकऱ्यांच्या खाजगीकरणाच्या राज्य शासन निर्णयाच्या विरोधात आज आम आदमी पार्टी तर्फे पुण्यात स्वारगेट चौक येथे थाळी नाद आंदोलन करण्यात आले. ज्या नऊ कंपन्यांच्या मार्फत ही कामगार भरती केली जाणार आहे. त्यातील काही कंपन्या या भाजप नेत्यांशी थेट संबंधातील आहेत, काही कंपन्यांचे संचालक सारखेच आहेत तर काही कंपन्यांच्या संचालकांवर महाआयटी घोटाळा केल्याचा आरोप आहे, काही संचालक हे दुबईला फरार असल्याचे आरोप आहेत. कामगारांच्या पगाराचा व पी एफचा 'प्रसाद' मिळवण्यासाठी या कंपन्यांचे 'लाड' बंद करा अशी मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आली.
राज्यातील हजारो -लाखो शिक्षक, इंजिनियर, वकील व शासकीय सेवेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या तरुणांच्या भवितव्याशी केलेला हा खेळ असून ही आधुनिक वेठबिगारीकडे वाटचाल आहे आणि यातून सरकारी सेवेतील आरक्षण संपवण्याचा डाव आहे, असा आरोप देखील यावेळी आम आदमी पार्टीच्या वतीने राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी केला.