नीलेश राऊत
पुणे : शिक्षकी पेशा, पण दरवर्षी पंढरीच्या वारीची आस. माउलीभक्तीत तल्लीन होऊन कोल्हापूरमधील राधानगरीपासून आळंदी व आळंदी ते पंढरपूर अशी वारी गेली कित्येक वर्षे न चुकता केली. ही वारी करताना इतर भक्तांप्रमाणेच भक्तीरसात तल्लीन होतानाच माउलींच्या चरणी आगळी-वेगळी सेवा अर्पण करण्याची कल्पना त्या अवलियाच्या डोक्यात आली आहे आणि त्यातूनच पुढे आला ज्ञानेश्वरी हाताने लिहून काढण्याचा संकल्प तसा हा आगळावेगळा प्रयोग, किंबहुना कोणी तो या दोन-तीन दशकांत केल्याचे निदर्शनास आलेले नाही; पण दोन हजार पानांची ज्ञानेश्वरी तीही सुवाच्च व सप्तरंगी अक्षरात लिहून काढण्याचा चंग काेल्हापूर जिल्ह्यातील राशिवडे ब्रु. ( ता. राधानगरी ) जिल्हा कोल्हापूर येथील एका निवृत्त शिक्षकाने बांधला.
अनिल बळवंत कावणेकर असे या शिक्षकाचे नाव. एम.ए.बी.एड असलेले कावणेकर सेवानिवृत्त शिक्षक आहेत. आता ते न चुकता वारी करतात; पण ही वारी करताना ज्ञानेश्वरी समजून उमजून ती पाठ करून तिचे स्वहस्ते लिखाण करण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले. ९ जानेवारी २००२ ते ६ जून २००२ या सहा महिन्यांच्या काळात त्यांनी ही ज्ञानेश्वरी स्वहस्ते तेही सप्तरंगांमध्ये व डोळ्याचे पारणे फेडेल अशी आहे. तसेच जशी काही छपाई आहे अशा सुवाच्च अक्षरात लिहून काढली.
दोन हजार पानांची ही ज्ञानेश्वरी लिहून काढतानाच, या ज्ञानेश्वरीवरील मुखपृष्ठ म्हणजे समाधीस्थ असलेले श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे अतिशय मनाेवेधक चित्र रवींद्र पोतदार यांनी साकारले आहे. यंदाच्या पंढरीच्या वारीमध्ये केवळ कोल्हापूर येथील विविध दिंडीकरांमध्ये, तसेच वारकऱ्यांमध्ये या हस्तलिखित ज्ञानेश्वरीची मोठी ख्याती आहे. अनेक वारकरी ही हस्तलिखितातील ज्ञानेश्वरी पाहण्यासाठी अनिल कावणेकर यांच्याकडे धाव घेत आहेत, तर दिंडी प्रमुखही या ज्ञानेश्वरीचे यथोचित प्रचार व प्रसार करीत असल्याने या हस्तलिखितातील ज्ञानेश्वरीचे मोठे नाव यंदाच्या वारीत चर्चिले जात आहे.