पुणे : आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाडी चालविली जाणार आहे. ही गाडी पुणे ते पंढरपुर दरम्यान दि. २१ ते २५ जुलै या कालावधीत धावेल.आषाढी यात्रा दि. २३ जुलै रोजी आहे. या यात्रेनिमित्त पुणे व सोलापूर परिसरातून अनेक भाविक पंढरपुरला जातात. त्यामुळे या कालावधीत एसटी, रेल्वेच्या नियमित गाड्या तसेच खासगी वाहनांना मोठी गर्दी होते. यापार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने पुणे ते पंढरपुरदरम्यान आषाढी विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दि. २१ ते २५ जुलै या कालावधीत ही गाडी दररोज सकाळी ६.१५ वाजता पुणे स्थानकातून सुटणार असून दुपारी एक वाजता पंढरपुर स्थानकात पोहचेल. तर दुपारी ३ वाजता पंढरपुर स्थानकातून पुण्याकडे रवाना होईल. रात्री ८.३५ वाजता गाडी पुणे रेल्वे स्थानकात दाखल होईल. गाडीला हडपसर, मांजरी बुद्रुक, लोणी, उरळी, यवत, केडगाव, पाटस, दौंड, भिगवण, पारेवाडी, जेऊर, कुडुर्वाडी व मोडलिंब हे थांबे असतील. गाडीचे सर्व डबे सामान्य श्रेणीची असतील, असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.
आषाढी स्पेशल, पुणे-पंढरपूर धावणार विशेष 'रेलगाडी'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 8:59 PM
मध्य रेल्वेकडून विशेष गाडी आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष गाडी २१ ते २५ जुलै या कालावधीत धावणार आहे.
ठळक मुद्देया कालावधीत एसटी, रेल्वेच्या नियमित गाड्या तसेच खासगी वाहनांना मोठी गर्दीगाडीला हडपसर, उरळी, यवत, केडगाव, पाटस, दौंड, भिगवण, जेऊर, कुडुर्वाडी आदी थांबे