पुणे : 'जय शिवाजी जय भवानी, भारत माता की जय, शिवाजी महाराज की जय, हिंदू साम्राज्याचा विजय असो', अशा घोषणा देत धारकरी सायंकाळी ५ वाजता संचेती चौकामध्ये आले. त्यांनी पालखी दर्शनासाठी रस्त्यावरच ठिय्या मांडला.
श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान कडून सर्व वारकरी यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी फेटे बांधून सर्व धारकरी पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी आले होते. शेकडो कार्यकर्ते यांनी हातात प्रतिष्ठानचा फलक घेऊन संचेती चौकात आगमन केले. तेव्हा सर्व फेटेवाल्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी पोलीस बंदोबस्त मोठा होता. अतिरिक्त पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी देखील धारकरी आल्यावर संचेती चौकात धाव घेतली. सर्व ठिकाणी पोलिसांनी दोरी लावली होती आणि चोख बंदोबस्त ठेवला होता. अनुचित प्रकार घडू नये म्हणून ही दक्षता घेतली होती.
यापूर्वी धारकरी हातात तलवारी घेऊन पालखीत सहभागी झाले होते. म्हणून तेव्हा खूप गोंधळ उडालेला. त्यानंतर त्यांना जोरदार विरोध झाला होता. त्यामुळे यंदा धारकरी यांच्या हातात तलवारी नव्हत्या. धारकरी यावेळी मोठ्या संख्येने पालखी सोहळ्यासाठी आले होते.