पुणे : दिल्लीतून प्रसिद्ध झालेल्या काँग्रेसच्या यादीत पुण्यातून रवींद्र धंगेकर यांनाच उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. पुणे शहर लोकसभा मतदारसंघात आता महायुतीचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्यात सामना होणार आहे. या उमेदवारीनंतर पुण्यात काँग्रेसचे नाराजीनाट्य दिसून आले होते. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांनी नवीन आलेल्याना तिकीट दिले जाते आणि ४० वर्षे काम करणाऱ्यांना विचारतही नाही. हि निष्ठांवंत पदाधिकाऱ्यांची हत्या असल्याचे सांगून नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आबा बागुल यांनी उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली होती. यावरून बागुल पक्षावर नाराज असल्याचे दिसून आले होते.
राजकीय वर्तुळात बागुल पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. अशातच बागुल यांनी या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोलेंच्या भेटीनंतर बागुल यांचे नाराजीनाट्य दूर झाले असून ते आता रवींद्र धंगेकर यांचा प्रचार करणार असल्याचे एका माध्यमाशी बोलताना सांगितले आहे.
बागुल म्हणाले, आमची कुठलीही नाराजी नव्हती. उमेदवार जाहीर झाल्यांनतर आमचं म्हणणं पक्ष श्रेष्टींकडे मांडायचं होतं. नाना पटोलेंनी आमच्या शंकांचं निरसन केलं. आम्ही काँग्रेसचे एकनिष्ठ पदाधिकारी आहोत. पर्वती मतदार संघ काँग्रेसकडे घेऊ असं त्यांना आम्ही सांगितलं आहे. आता काँग्रेसने निवडलेले उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा आम्ही प्रचार करणार आहोत. रवींद्र धंगेकर आजच विजयी झाले आहेत. फडणवीस यांना भेटायला गेले होते याबाबत विचारले असता बागुल म्हणाले, आम्ही वैयक्तिक कामासाठी त्यांची भेट घेतली होती.
बाळासाहेब थोरातांनीही केली होती मध्यस्थी
काँग्रेसचे नाराज माजी नगरसेवक आबा बागूल यांची माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. माजी राज्यमंत्री रमेश बागवे तसेच ज्येष्ठ नेते, माजी आमदार उल्हास पवार हेही त्यांच्या समवेत होते. ‘पक्ष सोडून जाऊ नका, प्रचारात सक्रिय व्हा, तुमच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ’ असे थोरात यांनी बागूल यांना सांगितले होते.