पुणे : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणुकीत मतदारांचा गोंधळ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे जिल्ह्यात पदवीधर मतदार संघात १ लाख ३६ हजार मतदार आहे. यापैकी केवळ २० हजार मतदार पुणे शहरात तर तब्बल ७० हजार मतदार हवेली तालुक्यातील आहे. यामध्ये एकट्या कात्रजमध्ये १८ हजार मतदार आहेत.
पुणे पदवीधर मतदार संघातील मतदार याद्यांमध्ये असलेल्या चुकांमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले या संदर्भात राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी लेखी तक्रारी केल्या आहेत. मतदार यादीतील चुका आणि घोळासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कडून कोणतेही स्पष्टीकरण दिले जात नाही. गेले दोन आठवडे उमेदवार आणि राजकीय पक्ष निवडणूक विभागाकडे तक्रारी करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मतदार यादी संदर्भात जाहीरपणे तक्रार केली. मतदार यादी वेळेत उपलब्ध झाली नाही तसेच मतदार यादी वर हरकती सूचना देखील घेतले गेले नाही. एकाच व्यक्तीचे नाव दहा वेळा मतदार यादीत असून १०० लोकांसाठी एकच मोबाईल क्रमांक तसेच पत्ते देखील एकसारखे देण्यात आले आहेत याकडे लक्ष वेधले तरीदेखील निवडणूक यंत्रणेकडून खुलासा केला जात नसल्याने विशेषता पुणे शहर आणि जिल्ह्यातील मतदार यादी संदर्भातील प्रश्न अद्यापही कायम आहे.
पुणे शहराची लोकसंख्या चाळीस लाखाच्या पुढे आहे परंतु एवढ्या मोठ्या शहरांमध्ये पदवीधर मतदारांची संख्या फक्त वीस हजार दाखवण्यात आली आहे. मात्र कात्रज सारख्या गावांमध्ये १८ हजार मतदार यादीमध्ये आहेत. हवेली तालुक्यामध्ये ७० हजार मतदार असून त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहर आणि खडकवासला मतदारसंघाचा देखील समावेश केलेला आहे. त्यामुळे पुणे शहराच्या हद्दीवरील मतदारांना केंद्र शोधण्यासाठी कसरत करावी लागेल.