लोकमत न्यूज
चाकण : चार महिन्यांच्या चिमुकलीचे थेट घरातून अपहरण करणाऱ्या महिलेला जेरबंद करण्यास पोलिसांना यश आले आहे. गर्भपात झाल्याचे लवपवण्यासाठी बाळाचे अपहरण केल्याची धक्कादायक कबुली आरोपी महिलेने दिली आहे.
राणी शिवाजी यादव (वय २८, रा. कुत्तर विहीर, आंबेजोगाई, बीड) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. तर धनश्री राजेंद्र नागपुरे (वय ४) असे अपहरण आणि सुटका झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. याप्रकरणी राजेंद्र प्रभाकर नागपुरे (वय ५३, रा. वाफगावरकर चाळ, मार्केट यार्डशेजारी, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
गेल्या आठवड्यात अपहरण झालेल्या बाळाची आत्या मंगल बाबुराव धकाते (वय ६६, सध्या रा. चाकण, मूळ रा. अहमदाबाद, गुजरात) यांच्याशी आरोपी महिलेने अपहरणाच्या एक दिवसापूर्वी ओळख केली होती. बुधवारी (दि.१७) दुपारी आरोपी राणी ही त्यांच्या घरी दुपारी ३.१५ च्या सुमारास गेली. त्यावेळी बाळाची आत्या मंगल धकाते घरात होत्या. धकाते कपडे धुण्यासाठी घराबाहेर गेल्या नंतर काही मिनिटात घरी आलेल्या आरोपी राणीने बाळासह पोबारा केला होता. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. तक्रार दाखल केल्यानंतर चाकण पोलिसांनी दोन पथके महिलेला पकडण्यासाठी केले होते. त्यांनी वेगाने तपास सुरू केला. शहरातील जवळपास १०० सीसीटीव्ही तपासण्यात आले. मेदनकरवाडी येथील बालाजीनगर भागात संबंधित महिला राहत होती. मात्र गुन्हा घडल्यानंतर ती गायब असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तिचे रेखाचित्र तयार करून त्याच्या आधारे तिला आंबेजोगाई, बीड येथून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच तिने बाळाचे अपहरण केल्याची कबुली दिली. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर उपायुक्त रामनाथ पोकळे, सुरेश हिरेमठ, रामचंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कठोरे, उपनिरीक्षक विजय जगदाळे, सुरेश हिंगे, राजू जाधव, हनुमंत कांबळे, आर. एम. झनकर, संदीप सोनवणे, अनिल गोरड, निखिल वरपे, मच्छिंद्र भांबुरे, मनोज साबळे, अशोक दिवटे, नितीन गुंजाळ, सुप्रिया गायकवाड, प्रदीप राळे या पोलीस पथकाने वेगाने तपास करून चिमुकलीची सुरक्षित सुटका केली आहे.
बाळाचे जन्मदाते आईवडील वेगळेच
फिर्यादी राजेंद्र नागपुरे हे अपहरण झालेल्या बाळाचे खरे पालक नाहीत. ही बाब पोलीस तपासात समोर आली होती. पुण्यात शिक्षण घेत असलेल्या एका जोडप्याला प्रेमसंबंधातून हे बाळ झाले आहे. त्या जोडप्याने चाकण येथील एका दवाखान्यात नागपुरे यांचे नाव देऊन जन्माला घातले. त्यांनतर नागपुरे यांना संबंधित बाळ देण्यात आले तेव्हापासून त्याचा सांभाळ तेच करत आहेत.
गर्भपात लपवण्यासाठी चोरले बाळ
आरोपी राणी यादव हीचा गर्भपात झाला होता. मात्र तिने गर्भपात झाल्याचे घरच्यांना सांगितले नाही. त्यामुळे तिला नवजात बालकाची गरज होती. तर नागपुरे यांना बाळाला संभाळण्यासाठी एका महिलेची गरज होती. हे राणी हिला कळल्याने तिने बाळाला सांभाळण्याचे काम सुरू केले. परंतु काही दिवस काम केल्यावर तिने बाळाला घेऊन पोबारा केला होता.
फोटो - चाकण पोलिसांचा योग्य तपास लावल्याने आयुक्तांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.