पुणे : स्वारगेट येथून चार वर्षांच्या मुलीचे अपहरण करण्यात आले. अपहरणकर्त्याचा शोध घेण्यासाठी वीस टीम तयार करून, सोशल मीडियावर तत्काळ माहिती प्रसारित करून सासवड बस स्टँडवर आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले. दहा तासांच्या आत स्वारगेट पोलिसांनी अपहरणकर्त्याचा छडा लावत मुलीला आईवडिलांच्या ताब्यात दिले.
अमोल शिंदे असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. राजू लक्ष्मण जाधव (वय ३६, रा. स्वारगेट) यांच्या चार वर्षांच्या मुलीचे एका अज्ञात व्यक्तीने अपहरण केले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला. अपहरणकर्त्याचा शोध घेण्यासाठी वीस टीम तयार करून पुणे ग्रामीण, शहर, रेल्वे स्टेशन, पुणे जिल्हा आदी विविध भागांत कसून तपास करण्यात आला. याविषयीची माहिती सोशल मीडियावर प्रसारित करण्याबरोबरच आसपासच्या पोलीस स्टेशनला कळविण्यात आली. सासवडच्या बस स्टँडवर एक व्यक्ती मुलीला घेऊन थांबला असल्याची माहिती स्वारगेट पोलीस ठाण्याला देण्यात आली. त्या माहितीची खात्री करून स्वारगेट पोलिसांनी दहा तासांच्या आत मुलीला आईवडिलांच्या हातात सोपविले.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर, पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, सहायक पोलीस निरीक्षक शेख, जमदाडे, रसाळ, पोलीस उपनिरीक्षक त्र्यंबके, आदलिंग, मोरे, लोहोटे तसेच स्वारगेट पोलीस तपास पथकातील पोलीस नाईक कुंभार, पोलीस शिपाई बढे, बोखारे, भोकरे, ढावरे, साळवे, कांबळे, उंडे, शितकाल, दळवी, पोलीस नाईक घोडके, मुंढे, पोलीस हवालदार पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
-------------------------------------