पुणे : पशुखाद्याच्या कच्च्या मालाचे एक कोटी रुपये वारंवार मागूनही न दिल्याच्या कारणावरून पाच जणांनी एका कंपनीच्या मालकाचे अपहरण करून त्याला मारहाण केली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी पाच जणांना अटक करून आणखी एकावर गुन्हा दाखल केला असून पाच जणांना ५ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी बुधवारी दिला. शंकर पांडुरंग चव्हाण (वय २८, रा. सांबरे गडहिंग्लज), विनायक रावसाहेब चौगुले (वय २४, रा. माळवे, ता. राधानगरी, कोल्हापूर), निखिल नारायण पाटील (वय २३, रा. मांगोली, आकानगर, कोल्हापूर), अरुण संभाजी परीट (सावर्डे, राधानगरी, कोल्हापूर), भय्यासाहेब दशरथ गायकवाड (वय ३१, रा. कृष्णानगर, विठ्ठलवाडी, आकुर्डी) अशी पोलीस कोठडी दिलेल्यांची नावे आहेत. मनोज पाटणे (रा. कोल्हापूर) यांच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी अरुणा प्रवीण लुंकड (वय ५०) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला व त्यांचे पती प्रवीण लुंकड यांची कंपनी आहे. त्यांच्या कंपनीला मनोज पाटणे पशुखाद्याचा कच्चा माल पुरवत होता. या कच्च्या मालाचे एक कोटी रुपये लुंकड यांच्याकडून येणे होते. पाटणे यांनी वारंवार पैसे मागून ते मिळत नव्हते.आरोपींच्या दुचाकी जप्त करायच्या आहेत. आरोपींचा साथीदार मनोज पाटणे याला अटक करायची आहे, आदी कारणासाठी आरोपींना पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी पक्षातर्फे न्यायालयात करण्यात आली. ती न्यायालयाने ग्राह्य धरून कोठडीचा आदेश दिला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ए. बी. भोसले करत आहेत. (प्रतिनिधी)पैशाच्या वादातून मारहाणप्रवीण लुंकड मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास कारमधून कार्यालयाकडे जात असताना आरोपींनी त्यांच्या कारला दुचाकी आडवी घालून लुंकड यांच्या ड्रायव्हरला कारमधून खाली उतरवून त्याला तेथेच सोडले. लुंकड यांना कात्रज येथील जांभूळवाडी तसेच शिवापूर टोल नाक्याजवळ येथे नेले. तेथे आरोपींनी प्रवीण लुंकड यांना मनोज पाटणे यांचे पैसे देत नसल्याने मारहाण केली.
अपहरण करणारे अटकेत
By admin | Published: May 04, 2017 2:49 AM