पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येत असलेल्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान गोंधळ उडाला. तसेच विद्यापीठाच्या यंत्रणेतून विधी शाखेचा 'क्रिमिनल जस्टिस' विषयाचा पेपर देखील गायब झाला. यापूर्वी देण्यात येणारी बीए. एलएलबी पदवी मिळणार नसल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये यामुळे संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे गुरूवारी विद्यापीठात ‘पुंगी बजाव ’आंदोलन करण्यात आले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मार्फत घेण्यात येत असलेल्या विविध ऑनलाईन परीक्षांमध्ये अनेक अडचणी येत या आहे. विद्यापीठाकडे याबाबत १४ हजारांपेक्षा जास्त तक्रारी उपलब्ध झालेल्या आहेत. तरी देखील विद्यापीठ प्रशासनाने या बाबत आजपर्यंत स्पष्टीकरण दिले नाही. याच गोष्टीचा निषेध नोंदवत आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यापीठात राडा घातला. आंदोलकांनी यावेळी पुणे विद्यापीठ परिसरातले बॅरिकेडिंगही तोडले.
विद्यापीठाने इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना डिप्लोमाचे गुण गृहीत धरून उत्तीर्ण केले जाईल,अशा स्वरूपाचे परिपत्रक विद्यापीठ प्रशासनाने काढले आहे, परंतु,अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊन सुध्दा अशा पद्धतीचा निर्णय का घेण्यात आला? अंतिम वर्ष वगळता इतर विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार नाहीत तरीही या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क का घेण्यात आले, अशा अनेक समस्यांबाबत अभाविपच्या कार्यकर्त्यांनी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या कार्यालयात घुसून आंदोलन केले.
कुलगुरू कार्यालयात विद्यापीठात उपस्थित नव्हते.त्यामुळे प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी यांनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली..त्यांच्याकडून समाधानकारक आश्वासन मिळत नसल्याने विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उमराणी यांना घेराव घातला.दुपारी बारा वाजेण्याच्या सुमारास सुरू झालेले आंदोलन सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होते.कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांनी सर्व मागण्यांवर नक्की विचार करू व तात्काळ निर्णय घेऊ ,असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.मात्र,विद्यार्थ्यांच्या समस्या सुटल्या नाही तर अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अभाविपचे पुणे महानगर मंत्री अनिल ठोंबरे यांनी दिला.