पुणे : पुणे महापालिकेने मिळकत कर वसुली करताना मिळकतकर धारकांना थकबाकीवर अभय योजनेव्दारे शास्तीमध्ये (व्याजात) ८० टक्के सवलत दिली आहे. गतवर्षीच्या तुलनेत महापालिकेला यावर्षी ७० कोटी रूपयांनी मिळकतकर प्राप्तीमध्ये वाढ प्राप्त झाली आहे़
महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गतवर्षी १ एप्रिल ते २० नोव्हेंबर दरम्यान ९७६ कोटी रूपये मिळकत कर मिळाला होता़ तोच यावर्षी १ हजार ४१ कोटी वर गेला आहे़ यामध्ये अभय योजनेचा लाभ घेत ७६ हजार २०७ मिळकतकर थकबाकीदारांनी १९५ कोटी ९६ लाख रूपये एवढा मिळकतकर भरला आहे़
१ एप्रिल पासून आजपर्यंत ६ लाख ६० हजार २२४ मिळकतधारकांनी मिळकतकर भरला असून, शहरात साधरणत: १० लाख ६१ हजार मिळकती आहेत़ मिळकतकर वसुलीसाठी महापालिकेने ५० लाखापर्यंतच्या थकबाकीदारांसाठी अभय योजना राबविली असतानाच, दुसरीकडे ५० लाखांपुढील मिळकत कर थकबाकीदारांवर थेट कायदेशीर कारवाई सुरू केली आहे़ या कारवाईत २० नोव्हेंबरपर्यंत ३२ मिळकती सील केल्या आहेत़ तर काही ठिकाणी थकबाकीदारांनी पुढील दोन-तीन दिवसात थकबाकी जमा करण्याचे सांगितल्याने त्यांच्यावर सध्या तरी कारवाई करण्यात आलेली नाही़
दरम्यान अभय योजनेमुळे शनिवार व रविवारीही नागरी सुविधा केंद्रातील कर आकारणी व कर संकलन विभाग सुरू राहणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे़
-----------------