पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने आयोजित ५० व्या राष्ट्रीय भारतीय शैली कुस्ती (मातीवरील) अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या अभिजित पाटील व अक्षय हिरगुडेने आपापल्या वजन गटात प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. सूरज कोकाटे, संजय सूळला रौप्य, तर संदीप काळेला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. रेल्वे संघाने ४३ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद जिंकले. महाराष्ट्र संघाला ३६ गुणांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.भारतीय शैली कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ५० व्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त बाबूराव सणस मैदानावर संपलेल्या या स्पर्धेत ५१ किलो गटात महाराष्ट्राच्या अभिजित पाटीलने हरियानाच्या अमितला गुणांवर पराभूत करून सुवर्णपदक जिंकले.६७ किलो गटात महाराष्ट्राच्या अक्षय हिरगुडेने हरियाणाच्या विकासला पराभूत करून सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. अभिजित पाटील आणि अक्षय हरगुडे यांना अनुक्रमे ४० व ५० हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. दुसरीकडे ६१ किलो गटात महाराष्ट्राच्या सुरज कोकाटला एनसीआरच्या रविंदरने अंतिम फेरीत पराभूत केल्यामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. सुरजला रोख ३० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. ८५ किलो गटात महाराष्ट्राच्या संजय सुळला दिल्लीच्या बलराजकडून अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागले. रौप्य पदक जिंकणाऱ्या संजयला रोख ४० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. ५१ किलो गटात महाराष्ट्राच्या विक्रमला कांस्यपदकासह रोख दहा तर १०० किलो गटात संदीप काळेला कांस्य पदकासह रोख ४० हजार रुपये पारितोषिक देण्यात आले.स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचे हस्ते झाले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, विश्वस्त व नगरसेवक हेमंत रासने, राज्य संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे व सर्व पदाधिकारी, माजी हिंद केसरी श्रीपती खचनाळे, गणपत आंदळकर, अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार, महाराष्ट्र केसरी चंद्राहास निमगिरे, रावसाहेब मगर, दत्ता गायकवाड, भारत केसरी विजय गावडे, गादीवरील हिंदकेसरी अमोल बराटे, रुस्तुमे हिंद अमोल बुचडे, शिवसेना आमदार उपमहाराष्ट्र केसरी नारायण पाटील, उपस्थित होते.अंतिम निकाल : ५१ किलो : अभिजित पाटील (महाराष्ट्र), अमित (हरियाना), विक्रम मोरे (महाराष्ट्र-ब), टी. किशन (तेलंगणा); ५५ किलो : दीपक (दिल्ली), राहुल (एनसीआर), अंकित (केंद्रीय पोलीस दल), विराज चौधरी (पंजाब-ब), ६१ किलो : रविंदर (एनसीआर), सूरज कोकाटे (महाराष्ट्र), सौरभ पाटील (महाराष्ट्र-ब), राकेश (रेल्वे-ब), ६७ किलो : अक्षय हिरगुडे (महाराष्ट्र), विकास (हरियाना), प्रदीप (रेल्वे), अमित कुमार (छत्तीसगड), ७५ किलो : विकास राणा (नौदल), विकास (रेल्वे), जयभगवान (केंद्रीय पोलीस दल), मनोज कुमार (उत्तराखंड), ८५ किलो : बलराज (दिल्ली), संजय सूळ (महाराष्ट्र), संदीप बन (रेल्वे-अ), प्रदीप (बिहार); १०० किलो : नरेश (रेल्वे), मोनू (एनसीआर), कपिल धामा (दिल्ली-ब), संदीप काळे (महाराष्ट्र-अ). (क्रीडा प्रतिनिधी)
अभिजित पाटील, अक्षय हिरगुडे यांना सुवर्ण
By admin | Published: May 01, 2017 3:08 AM