लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : १४ वर्षांखालील मुले व मुलींच्या गटातील तिसऱ्या पीएमडीटीए-केपीआयटी लिटल कुमार चॅम्पियनशिप सिरिज स्पर्धेत अंतिम फेरीत मुलांच्या गटात अभिराम निलाखे याने आणि मुलींच्या गटात देवांशी प्रभुदेसाईने विजेतेपद मिळवले.
ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्यातर्फे पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) व केपीआयटी यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा महाराष्ट्र पोलीस टेनिस जिमखाना येथे झाली.
मुलांच्या गटात अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित अभिराम निलाखे याने विश्वजित सणसचा ४-०, ४-१ असा पराभव केला. अभिराम हा बाळकृष्ण मंदिरचा विद्यार्थी असून सातवीत शिकत असून पार्थ चिवटे टेनिस अकादमीमध्ये सराव करतो. त्याचे या वर्षातील या गटातील दुसरे विजेतेपद आहे.
मुलींच्या गटात अंतिम फेरीत तिसऱ्या मानांकित देवांशी प्रभुदेसाई हिने दुर्गा बिराजदारचा ४-०, ४-१ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. ओम दळवी मेमोरियल ट्रस्टचे उमेश दळवी यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. या वेळी मारुती राऊत आणि स्पर्धा निरीक्षक रेशम रणदिवे आदी उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल :
१४ वर्षांखालील मुले : उपांत्य फेरी :
विश्वजित सणस वि.वि. अद्विक नाटेकर (१) ६-५(५);
अभिराम निलाखे (२) वि.वि. मनन अगरवाल ७-०;
अंतिम फेरी: अभिराम निलाखे (२) वि.वि.विश्वजीत सणस ४-०, ४-१;
१४ वर्षांखालील मुली : उपांत्य फेरी :
देवांशी प्रभुदेसाई (३) वि.वि. मृणाल शेळके ७-४;
दुर्गा बिराजदार वि.वि. क्षीरीन वाकलकर (४) ७-५;
अंतिम फेरी : देवांशी प्रभुदेसाई (३) वि. वि. दुर्गा बिराजदार ४-०, ४-१.