पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) या २०१८मध्ये झालेल्या परीक्षेत ६०० ते ७०० परीक्षार्थींचे गुण वाढविण्यासाठी शिक्षण विभागातील तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर याने सुमारे पाच कोटी रुपये दिल्याचे जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा व्यवस्थापक अश्विनकुमार शिवकुमार याने पोलीस तपासात सांगितले आहे. त्यामुळे हे ६०० ते ७०० विद्यार्थी कोणत्या एजंटच्या माध्यमातून संपर्कात आले, सावरीकर याने गुण वाढविण्यासाठी एकूण किती परीक्षार्थींकडून पैसे घेतले आहेत, याबाबत सावरीकरकडे तपास करायचा आहे, असे सहाय्यक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयाला सांगितले. त्यानुसार, न्यायालयाने अभिषेक सावरीकर याला १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. ए. शेख यांनी हा आदेश दिला.
‘टीईटी’च्या २०१८मध्ये झालेल्या परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणात सावरीकर याला अटक करून सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. टीईटी परीक्षेत अपात्र ठरलेल्या परीक्षार्थींना पात्र करण्यासंदर्भात या परीक्षेच्या आयोजनाचे कंत्राट घेतलेल्या जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक डॉ. प्रीतेश देशमुख, सौरभ त्रिपाठी आणि अभिषेक सावरीकर यांची डिसेंबर २०१७मध्ये दिल्ली येथे बैठक झाली होती. त्यानंतर सावरीकरने अन्य आरोपींच्या मदतीने टीईटी २०१८ परीक्षेतील अपात्र विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना पात्र करण्याची योजना आखली. सावरीकर याने गुण वाढविण्यासाठी एकूण किती परीक्षार्थींकडून पैसे घेतले आहेत, या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याबाबत तपास करण्यासाठी सावरीकर याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहाय्यक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.