वडगाव मावळ (पुणे) : पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायम रद्द करा, असा मावळातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकमुखी ठराव केला. त्यासोबतच शुक्रवारी हजारोंच्या उपस्थितीत तहसीलदार कार्यालयावर सर्वपक्षीय कृती समितीचा मोर्चा काढण्यात येणार आहे. पवना प्रकल्प रद्द करण्यासाठी मावळातील सर्वपक्षीय एकत्र तर हा प्रकल्प व्हावा यासाठी पिंपरी चिंचवडचे सर्वपक्षीय नेते एकत्र आल्याने आता शासन दरबारी ही लढाई मावळकर जिंकणार की पिपरी चिंचवडकर याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पास शेतकऱ्यांसह सर्व राजकीय पक्षांचा सुरुवातीपासून विरोध होता. याबाबत मोठे आंदोलन झाले होते. या आंदोलनात तीन शेतकऱ्यांचा बळी गेला असे असताना राज्य शासनाने या प्रकल्पावरील स्थगितीचे आदेश उठवून जलवाहिनी प्रकल्प करण्यास परवानगी दिल्याने मावळ तालुक्यात शेतकऱ्यांसह, सर्व पक्षातील नेतेमंडळींनी नाराजी व्यक्त केली होती.
प्रकल्प रद्द करा सर्वपक्षीय नेत्यांचा बैठकीत एकमताने ठराव
पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पास विरोधी करण्यासाठी सोमाटने फाटा येथे बुधवारी सर्वपक्षीय बैठक पार पडली. यावेळी किसान संघाचे अध्यक्ष शंकराव शेलार, माजीमंत्री बाळा भेगडे, गणेश भेगडे, रिपल्बिकन पक्षाचे नेते सूर्यकांत वाघमारे, भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे, किशोर भेगडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ, ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, मनसेचे तालुकाध्यक्ष रूपेश म्हाळसकर, ठाकरे गट शिवसेनेचे भारत ठाकूर, शिंदे गट शिवसेनेचे शरद हुलावळे, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, एकनाथ टिळे यांच्यासह शेतकरी व सर्व पक्षातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.