केडगाव : दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथील नवविवाहितेला छळ करत तिच्या सासरी ( आदर्श नगर, सांगवी पिंपरी चिंचवड) येथे मारहाण केल्याने गर्भपात झाल्याची घटना घडली आहे. याबाबत यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असुन नवविवाहितेचे पती निलेश मोहन सलगर, सासरे तुकाराम मोहन सलगर, सासु सुनंदा मोहन सलगर, नणंद अश्विनी तानाजी मरगळे (सर्व राहणार आदर्श नगर रोड, नवी सांगवी , पिंपरी चिंचवड) त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.
या नवविवाहितेचे १४ नोव्हेंबर २०१९ रोजी लग्न झाले असून लग्नानंतर सासरच्या मंडळींनी बोरीपार्धी येथील तिच्या माहेरच्या मंडळीकडे सोन्याची मागणी केली. सोने न दिल्यामुळे मारहाण केली. या काळात सदर महिला गर्भवती असल्याने माहिती असूनही जानेवारी २०२१ मध्ये सासरच्या मंडळींनी पोटात व पाठीमध्ये लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर सदर महिलेने सोनोग्राफी केली असता सदर गर्भाचे हृदयाचे ठोके बंद झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी महिलेचा गर्भपात झाला. त्यानंतर पतीने सदर महिलेला बोरिपारधी येथे माहेरी आणुन सोडले. ऑक्टोबर २०२१ मध्ये महिला माहेरी असताना प्रतीने पुन्हा शिवीगाळ केली. सदर महिलेच्या लग्नामध्ये घातलेले दहा तोळे सोने सासरच्या मंडळींनी ताब्यात घेतले. लग्नाच्या वेळी पतीने सरकारी नोकरीमध्ये नसतानाही सरकारी नोकरी मध्ये असल्याचे सांगुन नवविवाहितेच्या माहेरच यांची फसवणूक केली. यावरून यवत पोलीस स्टेशन मध्ये सासरच्या मंडळींवर गर्भपात करणे, फसवणूक, मारहाण ,शिवीगाळ आदी कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासरच्या मंडळीनी पैकी पती व सासरे यांना पोलिसांनीअटक केली आहे.