पुणे : कोरोनाच्या साथीचा इतर उपचार, तसेच शस्त्रक्रियांवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. गर्भपाताच्या संख्येतही कोरोनाकाळात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. गर्भावस्थेतील गुंतागुंतीच्या स्थितीमुळे होणारे गर्भपात आणि वैयक्तिक कारणास्तव करुन घेतले जाणारे गर्भपात या दोन्हींचे औंध जिल्हा रुग्णालयातील प्रमाण घटल्याचे आकडेवारीवरून सिध्द होत आहे.
गर्भधारणा झाल्याचे योग्य वेळी झालेले वैद्यकीय निदान, आवश्यक तपासण्या आणि याबाबतच्या जनजागृतीमुळे देखील गर्भपाताचे प्रमाण घटल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. याचबरोबर, कोरोनाकाळात सुरक्षित संबंधांना प्राधान्य देण्यात आल्यानेही गर्भपाताचे प्रमाण घटल्याचा निष्कर्ष काढला जात आहे.
हार्मोन्सची असंतुलित पातळी, मधुमेह, वेदनाशामक गोळयांचे अतिसेवन, संसर्ग, रक्तस्त्राव अशा विविध कारणांमुळे गर्भपात होण्याचा धोका निर्माण होतो. नैैसर्गिकरित्या होणारा गर्भपातामागे गर्भातील दोष, गुणसुत्रांमधील दोष, गर्भाच्या पिशवीचे तोंड मोठे असणे अशी विविध कारणे असू शकतात. आपणहून केल्या जाणाऱ्या गर्भपाताचा निर्णय घेताना स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला अत्यंत महत्वाचा ठरतो. अवैैध गोळयांच्या सेवनाने जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, याकडे स्त्रीरोगतज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.
----------------------
सन २०१८-१९ २०१९-२० २०२०-२१ २०२१ जूनपर्यंत
-----------------------------------------------------------------
गर्भपात होणे ३५ ५९ ४१ १६
गर्भपात करुन घेणे १०० १२२ २३ १३
-----------------------
कोरोना काळात औैंध जिल्हा रुग्णालयात गर्भपातासाठी आलेल्या महिलांना कोरोना चाचणी करुनच दाखल करुन घेण्यात आले. कोरोनामुळे गर्भपात झाले, अशी माहिती अद्याप हाती आलेली नाही. पहिल्या तीन महिन्यांमध्ये संसर्ग, गुणसुत्रांमधील दोष, अवजड सामान उचलणे किंवा जास्त काम यामुळे गर्भपात होऊ शकतो. दुस-या तिमाहीमध्ये गर्भाशयाच्या पिशवीचे तोंड जन्मापासूनच मोठे असल्यास गर्भपाताची शक्यता निर्माण होते. अशा वेळी गर्भपात टाळण्यासाठी पिशवीला टाके घातले जातात.
- डॉ. नीलम दीक्षित, प्रसुती विभाग प्रमुख, औैंध जिल्हा रुग्णालय
--------------
गर्भ पोटात असताना कोरोना झाल्यास...
* गर्भवती महिलांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी इतर नागरिकांप्रमाणेच मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
* कोरोनाचा संसर्ग झाल्यास घाबरुन जाऊ नये किंवा लक्षणांकडे दुर्लक्ष करु नये. डॉक्टरांच्या सल्लयाने ताबडतोब उपचार सुरु करावेत.
* गर्भ पोटात असल्याने कोरोना काळात दोन जीवांची काळजी घेणे आवश्यक असते. त्यामुळे सकारात्मकतेने यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा.