कुंजीर यांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्षण विभागाकडून शाळा व्यवस्थापन समितीची सभा ऑनलाईन, ऑफलाईन सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन आयोजित करुन अध्ययन, अध्यापन याबाबत चर्चा करावी. सर्व शिक्षकांनी गुगल क्लास रुम, वेविनार, झुम ॲप. दिक्षा ॲप. शैक्षणिक व्हिडिओ व इतर ई - साधनांचा परिणामकारक वापर करुन अध्यापन करावे. दखलपात्र आंगणवाडीतील ६ वर्षावरील बालकांची १०० टक्के पटनोंदणी करून सर्व शाळांचे अहवाल जमा करुन एकत्रित अहवाल १७ जुन रोजी गटशिक्षणाधिकारी यांनी जिल्हा कार्यालयास सादर करावा.
गुगल फॉर्मद्वारे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात यावी. शाळेत विलगीकरण केंद्र असल्यास प्रवेश व अन्य कामकाजासाठी शाळा निर्जंतुकीकरण करून आवश्यक काळजी घेऊनच शाळेचा वापर करावा. शाळा स्वच्छता व निर्जंतुकीकरणाचे काम ग्रामपंचायत यांचेमार्फत करुन घ्यावे. इयत्तानिहाय जुन्या पाठ्यपुस्तकाबाबत आढावा घेऊन पुस्तके संकलित करावीत व पुढील इयत्तेच्या विद्याथ्यांना त्याचे वाटप करावे. शाळेतील सर्व उपक्रमांबाबत पालकांशी ऑनलाईन संपर्क व संवाद ठेवून अध्ययनातील विद्याथ्यांचा ऑनलाइन सहभाग वाढवावा. शाळांची दुरुस्ती, नवीन बांधकामे तसेच मॉडेल स्कूल संदर्भातील इतर भौतिक सुविधा या कामांना आवश्यकतेनुसार प्राधान्य देऊन कामे वेळेत पूर्ण करावी. असे आदेश देण्यात आले आहेत.
परंतु असे असले तरीही हवेली तालुक्यातील सुमारे २०० शिक्षक अद्यापही कोविड नियंत्रण कक्ष, कोविड सेंटर, खाजगी रुग्णालये आदी व इतर ठिकाणी फ्रंटलाईन वर्कर म्हणून कार्यरत आहेत. मिळालेल्या आदेशानुसार त्यांनाही शाळेत विद्यार्थ्यांचे शाळा प्रवेश, पटनोंदणी, शैक्षणिक पूर्वतयारी तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन अध्यापनाचे काम करावे लागणार आहे.
या सर्व बाबींचा विचार करून सदर शिक्षकांच्या कोविड १९ कामासंदर्भातील नेमणूका रद्द करण्यात याव्यात अशी मागणी हवेली तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष रमेश कुंजीर यांनी तहसीलदार व हवेली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचेकडे एका अर्जाद्वारे केली आहे.
--
प्राथमिक शिक्षकांना शासनाच्या निर्देशानुसार प्राधान्याने करोनासंदर्भातील कार्य महत्वाचे आहे. संभाव्य तिसरी लाट गृहीत धरून त्याबाबतचे काम वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सुरू आहे. शिक्षकांना या कामातून मुक्त करणेबाबत शासन स्तरावरून अथवा वरिष्ठ कार्यालयातून कोणताही आदेश प्राप्त झालेला नाही.
- विजयकुमार चोबे,
अपर तहसीलदार हवेली.