गर्भधारणा आणि प्रसूती हे स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचे टप्पे असतात. प्रसूतीनंतर स्त्रीमध्ये शारीरिक बदलांप्रमाणेच मानसिक बदलही होत असतात. तिच्यावर पूर्णतः अवलंबून असलेला एक नवा जीव जन्माला आलेला असतो. आयुष्यातील हा आनंदाचा प्रसंग असतानाच जबाबदारीही वाढलेली असते. दिवसभरातील कामांचे बदललेले प्राधान्यक्रम, आहारातील बदल, स्तनपान, झोपेच्या अपुऱ्या वेळा, वाढलेली बंधने, मदतीला कोणी नसल्यास वाढलेली जबाबदारी अशा अनेक कारणामुळे ''पोस्ट पार्टम ब्ल्यूज'' किंवा ''पोस्ट नेटल डिप्रेशन''ची समस्या बळावते.
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, ''बाळंतपणानंतर महिलांमध्ये शारीरिक आणि मानसिक बदलही होत असतात. १५-२० टक्के महिलांना नैराश्य येते. उदास वाटणे, भूक न लागणे, झोप न येणे, चिडचिड होणे, एकटेपणा वाटणे अशी लक्षणे दिसू लागतात. नैराश्य वेळीच टाळता येण्याजोगे असते. पुरेशी विश्रांती, कुटुंबाकडून पाठिंबा, मानसोपचारतज्ज्ञांकडून समुपदेशन, सकारात्मक विचार, काही कालावधीसाठी औषधोपचार यांच्या साहाय्याने या समस्येवर मात करता येऊ शकते.''
-----
गर्भावस्थेदरम्यान काही हार्मोनची पातळी वाढलेली असते. प्रसूतीनंतर हार्मोनची पातळी एकदम खाली येते. प्रोजेस्टेस्टेरॉनसारख्या हार्मोनची पातळी कमी होते, तर ऑक्सिटोसिनसारखे हार्मोन वाढतात. हार्मोनच्या कमी-जास्त पातळीमुळे होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक बदलांशी जुळवून घेणे अवघड होते. मुलगी झाल्यास ऐकावे लागणारे टोमणे, सिझेरियन डिलिव्हरी, स्तनपानातील अडचणी, बाळाला सांभाळताना होणारी कसरत अशा अनेक कारणांमुळे नैराश्य येऊ शकते. नोकरदार महिलांना पूर्ण वेळ घरी राहण्याची सवय नसते. प्रसूतीनंतर पूर्ण वेळ जबाबदारी आल्याने उदास वाटू शकते. दूध कमी येणे, उदास वाटणे, वजन कमी होणे, झोप पूर्ण न होणे, पाठदुखी अशी लक्षणे दिसू लागतात. कौन्सलिंगमधून अनेक प्रश्न सुटू शकतात. काही वेळा औषधोपचारांची गरज भासते. काही वेळ बाळाला घरातील दुसऱ्या व्यक्तीने सांभाळणे, संध्याकाळी थोडा वेळ मोकळ्या हवेत फिरून येणे, थोडे आवडीचे पदार्थ खाणे, कुटुंबाने मानसिक स्थिती समजून घेणे अशा काही उपायांनी यावर मात करता येऊ शकते.
- डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी, स्त्रीरोगतज्ज्ञ