सुपे (पुणे): अवकाळी आलेल्या पावसामुळे तसेच थंडीने गारठून राज्यातील सुमारे ३ हजार ४०० मेंढ्यांचा मृत्यू झाला असून पुणे जिल्ह्याचा आकडा २ हजाराहून अधिक आहे. या घटनेने मेंढपाळांनी घाबरुन न जाता शासनाकडून तत्काळ सर्वोतोपरी मदत दिली जाईल असे आश्वासन राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. सुपे नजीक शुक्रवारी ( दि. ०३ ) रात्री आठ वाजता मेंढपाळांच्या वाड्यावर प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाहणी केली. येथील मेंढपाळांकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली यावेळी भरणे बोलत होते.
भरणे म्हणाले, सध्या राज्यात अवकाळीचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. त्यातच राज्यातील पुणे, नाशिक, अ. नगर, सातारा, रायगड आदी ठिकाणच्या मेंढपाळांच्या सुमारे ३ हजार ४०० मेंढ्या दगवल्याची माहिती त्यांनी दिली. तर एकट्या पुणे जिल्ह्याचा आकडा २ हजाराच्यापुढे आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर ( ७५० ), आंबेगाव ( ४०३ ), शिरूर ( १८१ ), पुरंधर ( १५० ), खेड ( ९४ ), बारामती ( ८८ ), मावळ ( ११० ), दौंड ( ४४ ), हवेली ( २३ ) आदी तालुक्यातील मेंढ्या दगावण्याचे प्रमाण जास्त आहे. मात्र मेंढपाळांनी घाबरुन न जाता शासन त्यांच्या पाठीशी उभे आहे. शासनाकडून त्यांना तात्काळ सर्वोतोपरी मदत दिली जाईल असे आश्वासन भरणे यांनी यावेळी दिले.
भरणे म्हणाले, अवकाळी पावसामुळे मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक शेळी मेंढीकरिता शासनाकडून ४ हजार, गाई करीता ४० हजार, बैलांकरीता ३० हजाराची तात्काळ मदत दिली जाईल. तर कानाडवाडीत लांडग्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मेंढ्यांची नुकसान भरपाई वनविभागाकडून त्वरीत दिली जाईल अशी माहिती भरणे यांनी दिली. भरणे यांनी प्रत्यक्ष दर्शनी पाहता काही मेंढ्या गारठल्याने चालता येत नव्हते. त्यांच्या पायात त्रान राहिला नव्हता. त्यामुळे त्यांना अशा पद्धतीने त्रास होऊन एक दोन दिवसात त्यांचा मृत्यु होत असल्याची माहिती मेंढपाळांनी दिली. सुपे व परिसरात अवकाळी पावसामुळे पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे येथील मेंढपाळांचे कुटुंब उध्वस्त होत असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी यावेळी दिली. यासाठी स्थानिक मेंढपाळांना निवारा शेड, मॅट आदीची मदत शासनाकडुन त्वरीत मिळावी अशी मागणी देवकाते यांनी केली.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते, पशुसंवर्धन उपायुक्त शितलकुमार मुकणे, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, नायब तहसिलदार विलास करे, पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अभिमान माने, पंचायत समितीचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. रमेश पाटील, मंडलाधिकारी एल. एस. मुळे, तलाठी नितीन यादव, धनंजय गाडेकर, मोरगावचे पशुधन विकास अधिकारी डॉ. औदुंबर गावडे, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. व्ही. जे. कांबळे, परिचर एस. डी. गाडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त जाती जमातीचे तालुका उपाध्यक्ष रामभाऊ लकडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अनिल हिरवे, कुतळववाडीचे माजी उपसरपंच दत्तात्रय कदम आदी उपस्थित होते.