पुणे : राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणा-या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी) येत्या ५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करणा-यास मुदत देण्यात आली असून डीएड, बीएड अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनासुद्धा टीईटी परीक्षा देता येईल, असा निर्णय राज्य शासनातर्फे घेण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे ३० ते ३५ हजार डी.एड., बी.एड. अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षक पात्रतेसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे बी.एड., डी.एड., पदवी उत्तीर्ण विद्यार्थी टीईटी परीक्षेसाठी अर्ज करत आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून शिक्षक भरती होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून येत नाही. डी.एड. अभ्यासक्रमास प्रवेश घेणा-या राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या १५ हजारांच्या आत आली आहे. परंतु,शिक्षक होण्यासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याने शासनाने बी.एड., डी.एड. अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा या अभ्यासक्रमाचा अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
----------------------
टीईटी परीक्षेस अर्ज करण्याची मुदत दोन ते तीन वेळा वाढविण्यात आली. विद्यार्थ्यांना येत्या ५ सप्टेंबरपर्यंत या अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. राज्यातील डी.एड. अभ्यासक्रमाच्या १४ हजार ३६० विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. बी.एड. अभ्यासक्रमाच्यासुद्धा सुमारे १५ ते २० हजार विद्यार्थ्यांना या परीक्षेस प्रविष्ठ होता येईल.
--------------------------------------------
डीएड. पदवी घेतल्यानंतर शिक्षक होण्यासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे डी. एड. उत्तीर्ण झाल्यानंतर परीक्षेस प्रविष्ठ होण्यापेक्षा डी. एड. अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षास असताना परीक्षेची संधी मिळत आहे. या संधीचा निश्चितच अनेक विद्यार्थी फायदा घेतील.
- प्रीती कावळे, विद्यार्थी
------------------