जवळपास ६०% वाहनचालक ही रस्त्यावरची वेग मर्यादा पाळत नाहीत ही बाब आता एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. पुण्यातल्या परिसर या संस्थेने ४ मोठ्या शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून हे स्पष्ट झालं आहे. वेग मर्यादेच्या नियम पाळला जावा यासाठी सरकार ने ठोस पावले उचलावीत अशी मागणी आता परिसर चा प्रतिनिधींनी पोलिस महासंचालकांना केली आहे.
युनायटेड नेशन च्या वतीने १७ ते २३ मे दरम्यान जागतिक रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला गेला. याच पार्श्वभूमीवर परिसरने रोड सेफ्टी नेटवर्क चा मदतीने राज्यातल्या ४ शहरांमध्ये सर्वेक्षण केलं. पुणे नाशिक औरंगाबाद आणि नागपूर मधल्या ३४ प्रमुख रस्त्यांवर हे सर्वेक्षण करण्यात आलं.या सर्वेक्षणानुसार २६ रस्त्यांवर जवळपास ६०% वाहनं ही वेगमर्यादा पाळत नव्हती. यापैकी ५ रस्त्यांवर जवळपास ९०% पेक्षा जास्त वाहनं वेगमर्यादा ओलांडत होती.
शहरांना लागू असलेल्या नियमानुसार महापालिका हद्दीतील रस्त्यांवर कार साठी ताशी ७० किमी तर दुचाकी साठी ताशी ६० किमीची वेगमर्यादा आहे.त्यातच ज्या भागांमध्ये शाळा,दवाखाने किंवा बांधकाम सुरू असेल तिथे ताशी २५ किमी चा वेगाने वाहन चालवता येते. औरंगाबाद मध्ये ही मर्यादा ताशी ४० किमी ची आहे. मात्र या सर्व शहरांमधल्या प्रमुख रस्त्यांवर ही वेगमर्यादा पाळली जात नसल्याचं या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
याविषयी बोलताना परिसर संस्थेचे रणजित गाडगीळ म्हणाले," आमचा सर्वेक्षणातून हे स्पष्ट झाले आहे की वाहनचालक कोणत्याही कारवाईचा भीती शिवाय वाहने चालवतात. नियमानुसार वेगमर्यादा ओलांडली तर १००० रुपयांचा दंड होत असतो. इतकंच नाही तर त्या वाहनचालकांचे लायसन्स ३ महिन्यांसाठी रद्द करण्याची देखील तरतूद आहे. मात्र नियमांची अंमलबजावणी आणि कारवाई होत नसल्याने सर्रास उल्लंघन होत आहे असे दिसत आहे."
परिसरचा वतीने आता या बाबत कठोर पावले उचलावीत अशी मागणी करणारे पत्र पोलिस महासंचालकांना लिहिण्यात आले आहे.