लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फेड्रेशन यांच्यातर्फे ‘वैशाख सन्मान प्रशस्तिपत्र’ देऊन भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचा गौरव करण्यात आला. बौद्ध तत्त्वज्ञानाच्या दुर्मीळ ग्रंथ जतनासह प्रकाशन, अनुवाद क्षेत्रातील मूलभूत कार्याबद्दल हा पुरस्कार दिला.
इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फेड्रेशनतर्फे दरवर्षी बौद्ध संस्कृती आणि वारसा जतन करणा-या संस्थांसह बौद्ध तत्त्वज्ञानाच्या विद्वान अभ्यासकांना ‘वैशाख सन्मान प्रशस्तिपत्रा’ने गौरविण्यात येते. कोरोना प्रादुर्भावाच्या निर्बंधांमुळे ऑनलाइन स्वरूपात हा कार्यक्रम घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सांस्कृतिकमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमामध्ये तीन वर्षांचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेला २०१९ या वर्षीचा पुरस्कार देण्यात आला. २०२० आणि २०२१ या वर्षांच्या पुरस्कारांमध्ये भारत, भूतान, थायलंड, व्हिएतनाम आणि इंग्लंड येथील सहा विद्वानांना सन्मानित करण्यात आले. प्राच्यविद्या संशोधन क्षेत्रात गेल्या शंभरहून अधिक वर्षे कार्यरत असलेल्या भांडारकर संस्थेकडे संस्कृत, प्राकृत, आशियाई आणि युरोपियन भाषांतील मिळून एक लाख ४० हजारांहून अधिक ग्रंथसंपदा आहे. त्यापैकी ८ हजार ६०० ग्रंथ दुर्मीळ स्वरूपाचे आहेत. तर, विविध माध्यमातील २९ हजार १५० हस्तलिखिते आहेत.
........................................