भीमा कोरेगाव - भीमा कोरेगाव व सणसवाडी (ता. शिरूर) येथे झालेल्या दंगलीमध्ये ९७ चारचाकी वाहने, ८६ दुचाकी, ४ रिक्षा , १४ टेम्पो, १५ दुकानांची तोडफोड करून अंदाजे २ कोटी ४० लाख रुपयांचे नुकसान झाले असून राहुल बाबाजी फटांगडे या तरुणाचा खून केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी कोरेगाव व सणसवाडीमध्ये दीड हजारापेक्षा जास्त लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत.शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व दत्ता शिवराम तारठे (रा. डोंगरवस्ती, सणसवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवार दि. १ रोजी सकाळी साडेबाराच्या सुमारास सणसवाडी येथील गवारे पेट्रोलपंपाच्या शेजारील जागेमध्ये राहुल बाबाजी फटांगडे (वय ३०, रा. साईनाथनगर, सणसवाडी) याला अज्ञात लोकांनी बेकायदा जमाव जमवून दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खून केल्याप्रकरणी भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९ व ३०२ अन्वये अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, सणसवाडी येथील चौकामध्ये २०० ते २५० अज्ञात लोकांनी सकाळी साडेदहा ते अडीचच्या सुमारास घोषणा देत जातिवाचक शिवीगाळ करत जुन्या वादाच्या कारणावरून दगडफेकीमुळे घोषणा देणाºया लोकांच्या भावनांचा उद्रेक होऊन दोन्ही जमावातील लोकांनी सार्वजनिक जागेत बेकायदा जमाव जमवून एकमेकांवर दगडफेक करून शांततेचा भंग करून ५ दुकाने, ३७ वाहनांची तोडफोड व जाळपोळ करून अंदाजे ९० लाख रुपयांचे नुकसान करून सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केल्याप्रकरणी २०० ते २५० अज्ञात लोकांविरोधात १४३, १४७, १४८, १४९ , ४२७ , ४३५ ४३६ , १६० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.पोलीस उपनिरीक्षक नितीन शिवाजी लडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, भीमा कोरेगावमध्ये सकाळी साडेअकराच्या सुमारास मा. जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडील मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) चा अंमल जारी असताना बेकायदा गर्दी जमवून हातात झेंडे घेऊन काठ्या, लोखंडी पाईप घेऊन पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना शासकीय काम करू न देता हाताने, लोखंडी पाईपाने व दगडाने काठ्याने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून जखमी करून तोडफोड व जाळपोळ केली. अंदाजे ८६ दुचाकी, ६० चारचाकी, ४ रिक्षा , १४ टेम्पो, १० दुकाने व हॉटेल, ३ सरकारी वाहन व इतरही वाहनांचे अंदाजे दीड कोटी रुपयांचे नुकसान केले असल्याचे सांगितले.तर सदाशिव दशरथ ब्रह्मराक्षस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ते व त्यांचा भाऊ सुनील, आई, पत्नी व मुलगी त्यांच्या मोटारने (एमएच २०, डीव्ही ३१२६) पुण्याकडून आळंदी मार्गे चाकण-शिक्रापूर रस्त्याने जात असताना पिंपळे जगताप हद्दीत १० ते १५ अज्ञात इसमांनी गाडीवर दगडफेक करून गाड्यांच्या काचा फोडून नुकसान केले. आई , मुलगी व पत्नी यांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याने गुन्हा दाखल केला असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.शाळांना आज सुटी नाहीपुणे : कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी विविध संघटनांच्या वतीने महाराष्टÑ बंदची हाक देण्यात आलेली आहे. त्यामुळे बुधवारी शाळा सुरू राहणार का, अशी विचारणा पालकांकडून केली जात होती. मात्र, शिक्षण संचालक कार्यालयाकडून सुटीबाबत कोणतीही अधिकृत पत्रक काढण्यात आलेले नाही.महाराष्टÑ बंदच्या पार्श्वभुमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. मंगळवारी दुपारी काही संघटना व राजकीय पक्षांकडून बंदची हाक देण्यात आली. त्यानंतर विविध शाळांच्या पालकांच्या वाटसआप ग्रुपवर शाळा सुरू राहणार का याबाबत प्रश्न विचारण्यात येत होते. शासनाकडून शाळांना अधिकृत सुटट्ी जाहीर करण्यात आलेली नाही, त्यामुळे शाळा प्रशासनाकडून शाळेला सुटट्ी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र काही प्राथमिक शाळांनी बुधवारी शाळेला सुटट्ी मेसेजही पालकांना पाठविले आहेत. महाराष्टÑ बंदच्या पार्श्वभुमीवर शाळांमधील उपस्थिती कमीच राहण्याची शक्यता आहे. बुधवारी शाळेत मुलांना न पाठविण्याचा निर्णय घेतल्याचे संवाद पालकांच्या वाटस्आप ग्रुप चर्चेले जात होते.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व संलग्न महाविद्यालये बुधवारी सुरू राहणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे.जमावबंदीकोरेगाव भीमा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर या परिसरात ‘जमावबंदी आदेश’ लागू करण्यात आला. तसेच पोलिसांच्या मदतीने या भागातील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. परंतु, खबरदारीचा उपाय म्हणून गावातील गुरुवारचा (दि. ४) आठवडेबाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.दोन गटांत झालेल्या दगड फेकीच्या घटनेनंतर मंगळवारी पेरणे, सणसवाडी, वढू बुद्रूक आणि कोरेगाव भीमा येथील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. मात्र, अनुचित घटना टाळण्यासाठी जमावबंदीचा आदेश लागू केला आहे.त्याचप्रमाणे सोशल मीडियावरून अफवा पसरू नये यासाठी परिसरातील इंटरनेट सेवा पूर्णत: बंद ठेवण्यात आली आहे. जिल्हा पोलीस प्रशासनासोबत महसूल विभागाचे अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या गावांमध्ये पोलिसांचा कडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.तसेच कोरेगाव भीमा येथे होणारा आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.तसेच सोमवारी झालेल्या घटनेत झालेली वित्तहानी आणि मालमत्ता नुकसानीचे पंचनामे करून त्याचा अहवाल राज्य सरकारला पाठविला जाणार आहे.
दुर्घटनेत अंदाजे अडीच कोटींचे नुकसान, शेकडो वाहनांची जाळपोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 2:51 AM