पुणे : महापालिकेच्या मिळकतकर विभागाने थकबाकी वसुलीसाठी जाहीर केलेल्या अभय योजनेतील दंडामध्ये ७५ टक्के सवलतीची मुदत १० फेब्रुवारीपर्यंत आहे. या योजनेतून महापालिकेला आतापर्यंत ११८ कोटी २६ लाख ८७ हजार ७८० रुपये मिळाले असून, ५८ हजार ३५३ जणांनी आपली थकबाकी जमा केली आहे. १० फेब्रुवारीनंतर या योजनेत दंडावर ५० टक्के सवलत दिली जाणार आहे.फ्लेक्स, जाहिराती, पत्रके यातूनही योजनेचा प्रसार करण्यात येत आहे. यामुळे सुरूवातीच्या काळात चांगली वसुली झाली, आता मात्र वेग मंदावला आहे. एकूण २ लाख ५२ हजार थकबाकीदारांपैकी ५८ हजार जणांनीच याचा लाभ घेतला असून, अद्याप १ लाख ४३ हजार थकबाकीदार शिल्लक आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मिळकत कर विभागाकडून करण्यात येत आहे.मिळकतकर विभागाचे उपायुक्त सुहास मापारी यांनी सांगितले, की अनेक सदनिका बंद करून स्थलांतर केलेल्या, परगावी किंवा परदेशी असलेल्या थकबाकीदारांची संख्याही बरीच आहे. काही सोसायट्यांमध्ये अशी अनेक कुटुंबे आहेत. त्यांचे दूरध्वनी क्रमांक किंवा परदेशातील पत्ते पालिकेकडे नाहीत. त्यामुळे त्यांच्यापर्यंत ही योजना गेलेलीच नाही. अशा सोसायट्यांच्या अध्यक्ष, सचिवांनी आपल्या या सदस्यांशी संपर्क साधून त्यांनाही त्यांची थकबाकी जमा करण्यास सांगण्याचे आवाहन मापारी यांनी केले.
अभय योजनेतील दंडावर ७५ टक्क्यांची सवलत १० पर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2016 1:43 AM