- युगंधर ताजणे
पुणे : पुणेकर राधिका दाते- वाईकर यांनी चक्क चंद्रावर १३ वर्षांपूर्वी जागा विकत घेतली. एक एकर जागेसाठी ५० हजार रुपयेही भरले. मात्र, फसवणूक झाल्याचे त्यांच्या खूप उशिरा लक्षात आल्याने त्यांनी आता पोलिसांत तक्रार दिली आहे, परंतु त्याची दखल घेण्यात आलेली नाही.
पंजाब येथील एका व्यक्तीने लुनर फेडरेशनच्या माध्यमातून चंद्रावर जागा खरेदी केल्याची बातमी राधिका यांनी एका वृत्तवाहिनीवर पाहिली. चंद्रावर जागा खरेदी करायची असल्यास थेट आमच्याशी संपर्क साधा, अशी जाहिरात बातमीनंतर करण्यात आली होती. राधिका यांनी संबंधित संस्थेशी संपर्क साधला. ६ नोव्हेंबर, २००५ रोजी ५० हजार रुपये आॅनलाइन भरले. एक एकर जागा खरेदी केल्याचे त्यांना सांगण्यात आले.
राधिका म्हणाल्या, माझे त्या वेळी नुकतेच लग्न झाले होते. टीव्हीवरील जाहिरातीने माझे लक्ष वेधून घेतले. लुनर फेडरेशनच्या माध्यमातून चंद्रावर एक कॉलनी उभारायचा मानस असल्याचे आम्हाला सांगण्यात आले.चंद्रावर पाण्याचा मुबलक साठा असून, तेथे मानवी वस्तीस पोषक वातावरण असल्याचे संबंधितांनी सांगताच, अगदी कमी वेळात पैसे भरले, असे त्या म्हणाल्या.नेमका कोणत्या कायद्यान्वये गुन्हा नोंदवायचा?माझा मुलगा कनिष्ठ महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकत आहे. त्याला भविष्यात मेडिकलला प्रवेश घेण्याची इच्छा असून पैशांची गरज आहे. हे प्रकरण खूप जुने असल्याचे सांगत, त्यासंबंधी नेमका कुठला कायदा लागू होतो, याबाबत पोलिसांना साशंकता आहे. पैसे मिळावेत, यासाठी सहा महिन्यांपासून अर्ज करीत आहे. त्याला प्रतिसाद मिळत नाही, असे वाईकर यांनी सांगितले.