पुणे : मोक्का गुन्ह्यातील फरार असलेला आरोपी चित्रपट पाहाण्यात दंग असताना थेट चित्रपटगृहात जाऊन पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले़ चित्रपटात शोभावी अशी ही कारवाई शिवाजीनगर पोलिसांनी मंगला चित्रपटगृहात शुक्रवारी रात्री अकरा वाजता केली़उमेश भाऊसाहेब अरबळे (वय २६, रा़ इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल दरोडा आणि जिवे मारण्याचा प्रयत्न व मोक्कांतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपी उमेश अरबळे हा मंगला टॉकीजमध्ये चित्रपट पाहात बसलेला आहे. त्याच्याविरोधात इचलकरंजी येथे गंभीर गुन्हे दाखल आहेत. अशी माहिती कोल्हापूर जिल्हा अपर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांना फोनवरून दिली.व्हॉट्सअॅपच्या फोटोवरून पकडलेयासोबतच त्याचे फोटोही व्हॉट्सअॅपवरून पाठवले. त्यानंतर पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत व तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप चव्हाण इतर कर्मचाऱ्यांसह मंगला टॉकीज येथे गेले.टॉकीजच्या व्यवस्थापकाच्या मदतीने त्यांनी व्हॉट्सअॅपवर मिळालेल्या फोटोवरून त्याला स्क्रीन क्रमांक तीन येथून ताब्यात घेतले. याची माहिती अपर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांना दिली. त्यानंतर त्याला इचलकरंजी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.